अवनीवाच्या गोष्टी । मैत्रेयी पंडित-दांडेकर
आम्हाला जरी हवेवर किंवा हॉटेलमधल्या शिळ्यापाक्या, चामट, वातड, बेचव, जंक अन्नावर जगायला आवडत असलं, तरी आमच्या मम्माला स्वतःचा वेळ, पैसे, शक्ती आणि संयम खर्च करून हेल्दी स्वयंपाक करून आम्हाला घरी जेवायला घालण्याची कित्ती कित्ती हौस आहे म्हणून सांगू? हे रोजच्या जेवणाचं झालं, पण काही विशेष (भारतीय) सण आले, की करण जोहर काकांच्या केथ्रीजीमधल्या इंटरव्हलनंतरच्या अनिवासी भारतीय काजोल काकू मम्माच्या अंगात येतात आणि ती देशप्रेमाने त्यांच्यासारखी किंवा कणभर जास्तच पेटून उठते. आणि मग लग्न होईपर्यंत वरण-भाताचा कुकरदेखील लावता न येणाऱ्या आमच्या या हौसाबाई, आमच्या हाऊसात कपुरांच्या संजीवलादेखील मागे टाकत, सणानुरूप सुंदर (किंवा कुरूप) असे अनेक ‘ओळखा पाहू’ पदार्थ करू लागतात.
तर अशाप्रकारे आमच्या अमेरिकन नवीन वर्षाची सुरुवात तिळगुळ आणि गुळपोळीने होते. मग पुरणपोळी, श्रीखंड, कैरीचं पन्हं, आंबेडाळ, आमरस, नारळी भात, कणकेचे दिवे, पुरणाचे दिंडं वगैरे मजल दरमजल करत करत शेवटी भाद्रपद महिना उजाडतो, लाडक्या गणपती बाप्पाची चाहूल लागते आणि बाहेरील इतर बेकायदेशीर पांढऱ्या पावडरींना निषेध असणाऱ्या आमच्या कॅलिफोर्नियातील घरी खास पुण्याहून किलोभर कोणतीशी सुवासिक पांढरी पावडर मोठ्या तोऱ्यात हजर होते.