अर्थविशेष । भूषण महाजन
लहानपणी मूल कुठल्याही उपायांनी चटकन झोपले नाही तर त्याची आई त्याला बागुलबुवाची भीती दाखवायची. अनेक बालगीतांपैकी एक ओठावर येते :
तो बघ आला बागुलबुवा
अंधाराचा घेऊन बुरखा
फार दांडगा रागीट हिरवा
हाती काळा सोटा नवखा
अशीच ट्रम्प महोदयांनी साऱ्या जगाला ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ची भीती दाखवली होती. ९० दिवसांत शरण या, नाहीतर खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा धमकीवजा इशारा त्यांनी जगाला दिला आणि जागतिक बाजार हलवून/ ढवळून टाकले. हळूहळू जगाला काही अंशी कळू लागले, की हा फक्त काल्पनिक बागुलबुवा आहे, त्याला फार घाबरायचे कारण नाही. चीनने तर अत्यंत मुजोर उत्तरे देऊन अमेरिकेला पेचात पाडले.
शेवटी बऱ्या बोलाने शरण या नाहीतर मीच तुम्हाला शरण येईन अशी मानसिकता दाखवत ट्रम्प ह्यांनी (नेहमीप्रमाणे) एकतर्फीच जाहीर करून टाकले, की आम्ही चीनबरोबर मोठा करार केला आहे. त्याच्या पाठोपाठ मी भारतासोबत मोठा करार करणार आहे असेही त्यांनी सांगून टाकले. आता तो करार काय होईल, कसा असेल, कुठली क्षेत्रे त्यात सामील होतील आणि कुठली भरडली जातील हे अजून गुलदस्त्यात आहे. पण ते लवकरच, कदाचित हा लेख प्रसिद्ध व्हायच्या आतही कळू शकेल.