ॲड. दत्तात्रय दि. नागपूरकर
वधस्तंभ, तेल काढण्यासाठी वापरला जाणारा कोलू, चाबकाच्या फटक्यांची शिक्षा देण्याची क्रूर पद्धत, निकृष्ट व अपुरे जेवण, अस्वच्छ व अत्यल्प पिण्याचे पाणी, जेवण व पाण्याची भांडी, अत्यंत छोट्या कोंदट अंधाऱ्या कोठडीत रात्री गेल्यावर नैसर्गिक विधी करण्याचीही होणारी गैरसोय आणि या सर्व भयकथांचे मूक साक्षीदार असलेले परिसरातले पिंपळ व वटवृक्ष पाहून मन भयकंपित होतं.
प्रजासत्ताक दिनाचा योग साधून आम्ही आयडीबीआय बँकेतील रिटायर्ड कर्मचारी चंद्रकांत सोमण, प्रसन्न काळे, अशोक कुलकर्णी, कन्या श्रेयासह काशिनाथ हिरेमठ, विवेक कुलकर्णी व मी सहकुटुंब अंदमान यात्रेस निघालो.
आमच्याबरोबर विमानात पुण्यातील आणखी आठ आनंदयात्री तसेच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. गोटुरकर व कुटुंबीय असे तिघेजण मिळून एकूण चोवीसजण होतो. औपचारिक ओळखपरेड पार पडली. रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी पुण्याहून सुरू झालेला प्रवास हैदराबादमार्गे पोर्ट ब्लेअर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी नऊ वाजता संपला.