डॉ. अविनाश भोंडवे
सुकामेवा म्हणजे पोषणाला चालना देण्याचा एक सोईस्कर आणि चवदार पर्याय मानला जातो. तरीही, दैनंदिन आहारात सुक्या फळांचा समावेश करताना, त्यांचे फायदे आणि तोटे दोन्ही विचारात घेणे आवश्यक ठरते. एकंदरीत विचार करता, या सुक्या फळांचे पौष्टिक आणि नैसर्गिक फायदे प्राप्त करण्यासाठी, कमी गोडीचे जिन्नस निवडल्यास त्यांचे संभाव्य धोके कमी होऊ शकतात.
दवाखान्यांमध्ये येणाऱ्या पेशंट्सकडून डॉक्टरांना खालील संवाद नेहमी ऐकायला मिळतात.
‘‘मला खूप अशक्तपणा वाटतोय. मी खजूर खाऊ का?’’
‘‘आमच्या बंड्याला मी रोज काजू, बदाम, पिस्ते खायला घालते. तरी त्याची तब्येत सुधारत नाही! वाळका तो वाळकाच राहिलाय!’’
‘‘दोन दिवस अन्नावर अजिबात वासना नव्हती, मी फक्त खजूर आणि अक्रोड खाल्ले.’’
सुकामेवा म्हणजे एक प्रकारचा अलौकिक अन्नपदार्थ आहे, अतिशय शक्तिवर्धक आहे, त्याने तब्येत सुधारते, रोजच्या जेवणाला तो पर्याय असतो असे समज मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सुकामेवा खरेच पौष्टिक असतो का, असल्यास कितपत असतो, आणि तो आरोग्याला उपयुक्तच असतो, की त्याने काही त्रासही उद्भवतात याबाबत आपल्याला माहिती असणे जरुरीचे ठरते.