जनरल मनोज मुकुंद नरवणे (निवृत्त)
आर्मी डे म्हणजे केवळ भूतकाळाचे स्मरण नाही, तर भविष्यासाठी कृती करण्याचे आवाहन आहे. भारतीय लष्कर काळाबरोबर जसजसे पुढे जात आहे, तसतशी तांत्रिक प्रगती स्वीकारणे, लष्कराच्या क्षमतांचे आधुनिकीकरण करणे आणि कार्यक्षमता बळकट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतीय लष्कराची निःस्वार्थ सेवा, समर्पण आणि शौर्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारीला ‘आर्मी डे’ अर्थात लष्कर दिन साजरा केला जातो. लष्कराची, देशाच्या उमद्या आधारस्तंभाची जबाबदारी ब्रिटिशांकडून भारतीयांकडे हस्तांतरित झाल्याची आठवण म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
जनरल (नंतरचे फील्ड मार्शल) कोडंदेरा एम. करिअप्पा यांनी १९४९मध्ये भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याच वर्षी जूनमध्ये त्यांची भारताचे लष्करप्रमुख (चिफ ऑफ आर्मी स्टाफ -सीओएएस) म्हणून नियुक्ती झाली होती. भारतीय सशस्त्र दलांचा समृद्ध इतिहास, लवचिकता आणि शौर्याचे स्मरण करून देणारा हा अभिमान आणि सन्मानाचा दिवस आहे. याप्रसंगी परेड्स, मिलिटरी शोज् आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.