डॉ. अरुण जामकर
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) आरोग्य क्षेत्रात परिवर्तनाचे वादळ घोंगावू लागले आहे. त्यामुळे पारंपरिक वैद्यकीय व्यवस्था, मूल्ये, उपचारपद्धती बाजूला सारल्या जाऊन त्यांची जागा अचूकता आणि गतीमानता या गोष्टी घेऊ लागल्या आहेत. एआयच्या वापरातून येणाऱ्या नवीन कल्पना, नवनिर्मिती यातून वैद्यकीय सेवेत क्रांतिकारक बदल घडविले जात आहेत.
या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना एआय आणि मशिन लर्निंग (एमएल) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी देण्यात आले. एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेल्या शक्यता आणि पुढे आलेली नवीन आव्हाने यांचा एक आढावा...
तीसएक वर्षांपूर्वीपर्यंत दुखणे घेऊन आलेल्या रुग्णाला डॉक्टर स्वतः तपासत असत. त्याच्या लक्षणांवरून रोगाच्या निदानाचा अंदाज बांधून औषधे देत असत. त्याला चार-पाच दिवसांनी परत फॉलोअपसाठी बोलावत असत. त्यावेळी औषधांचा परिणाम झाला आहे का, कसा झाला याचे आडाखे बांधून पुढील उपचार केले जात.
कालांतराने सीटी-स्कॅन, एमआरआय अशी तंत्रे विकसित झाल्यामुळे वैद्यकीय सेवेने असाध्य रोगांच्या लवकर आणि अचूक निदानाचा मोठा पल्ला गाठला. पाठोपाठ लॅप्रोस्कोपिक सर्जरीमुळे शस्त्रक्रियेचे तंत्रच बदलले.
माणसाच्या जीविताशी थेट संबंध असलेले हे क्षेत्र सर्वांत संवेदनशील आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये ‘एआय’ने या क्षेत्रात अक्षरशः उलथापालथ केली आहे. त्यामुळे रोगनिदान आणि उपचार यात मूलभूत संकल्पना बदलल्या आहेत. या जुन्या संकल्पनांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘मशिन लर्निंग’ (एमएल) आणि त्यापुढे जाऊन आता ‘डीप लर्निंग' (डीएल), ‘आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क' (एएनएन) यांनी घेतली आहे.