Australia tourism
Esakal
भ्रमंती । डॉ. श्रीकांत कार्लेकर
ससेक्स इनलेट हा साडेसात किलोमीटर लांबीचा भरती-ओहोटी प्रवाह, काँजोलाची पुळण, हॅम्स बीचवरचा पांढऱ्याशुभ्र वाळूचा पसारा, शोलहेवनची भूशिरे आणि उल्लाडुल्लाच्या किनाऱ्यावरील अश्मीभूत ठसे ही सगळीच वेड लावणारी सागर शिल्पे या किनाऱ्याचे सौंदर्य अधिक ठसठशीत करतात यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वी मी, माझी पत्नी प्रभा आणि मुलगी अनुराधा असे तिघे ऑस्ट्रेलियाला अभय देसवंडीकर या माझ्या विद्यार्थ्याकडे गेलो होतो. आम्ही तिथे जाण्यापूर्वीच अभयने कुठे कुठे जायचे आणि नेमके काय बघायचे याची जुळवाजळव करून ठेवली होती. समुद्रकिनाऱ्याबद्दलची आमची दोघांचीही आवड मनस्वी होती. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स किनाऱ्याचा न्यू कॅसल ते जर्व्हिस बे हा ३५० किलोमीटर लांबीचा भाग आम्ही त्यावेळी पाहिला. तिथली माणसे त्यांच्या देशाचा अमूल्य निसर्ग खजिना सांभाळण्यासाठी किती मनापासून प्रयत्न करतात त्याचाही अनुभव घेऊ शकलो.
पर्यटन हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख व्यवसाय आहे. जगभरातून या किनारी भागांत पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांकडे, त्यांना मिळणाऱ्या सर्व सुख-सुविधांकडे आणि मुख्य म्हणजे किनारपट्टीचे सौंदर्य अबाधित ठेवण्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. आम्हाला ते अनेक वेळा जाणवले. नकळतपणे माझ्या मनात भारतातले किनारे आणि त्यांची दयनीय अवस्था आणि त्यांची सर्व थरातून होणारी अनास्था या सर्व गोष्टींची तुलना होत राहिलीच. मला ऑस्ट्रेलियाच्या या किनारी प्रदेशात दिसणाऱ्या पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, समुद्रकडे, विस्तीर्ण वाळूच्या टेकड्या, सागर तट मंच आणि आपल्याबरोबर हात धरून चालणारा अथांग निळाशार प्रशांत महासागर यांनी अगदी वेड लावले.