प्रसाद नामजोशी
आन्या अमासोवा ही एक अतिशय सुंदर आणि धाडसी बॉन्ड गर्ल. ‘ट्रिपल एक्स’ नावानं ओळखली जाणारी ही एक रशियन हेर आहे. बॉन्डच्या बरोबरीनं काम करणारी स्वयंपूर्ण बॉन्ड गर्ल साकारणारी बार्बरा बाख ही अभिनेत्री अगदीच अमेरिकी होती. तिचा जन्मच न्यू यॉर्कचा. बार्बरा गोल्डबाख हे तिचं जन्मनाव.
प्रत्येक बॉन्डपट आपलं काहीतरी वैशिष्ट्य घेऊन येतो. त्यात अनेक गोष्टी ‘इतिहासात प्रथमच’ या पद्धतीच्या असतात. अनेकदा त्या दर्जेदार असतातच असं नाही, पण दरवेळेला काहीतरी करामत झालेली असतेच. १९६२ साली इऑन फ्लेमिंगनं जेम्स बॉन्ड मालिकेतली आपली दहावी कादंबरी लिहिली, तिचं नाव होतं द स्पाय हू लव्ह्ड मी.
या कादंबरीवर १९७७मध्ये जेम्स बॉन्ड मालिकेतला दहावा चित्रपट तयार झाला. खरंतर ‘या कादंबरीवर’ असं म्हणणं हा त्या चित्रपटावर आणि कादंबरीवरही अन्यायच आहे! कारण निर्मात्यांनी फ्लेमिंगच्या कादंबरीचं फक्त नाव चित्रपटात वापरलं, मात्र चित्रपटाची गोष्ट पूर्णतः नव्यानं लिहिली!
त्यामुळे लेखक तोच, कादंबरीचं नावही तेच, पण कादंबरी दक्षिणेकडे तर चित्रपट उत्तरेकडे अशी परिस्थिती. जेम्स बॉन्डचा चित्रपट म्हणजे दरवेळेला आम्ही काहीतरी वेगळंच करणार म्हणून या चित्रपटात हे घडवलं आहे, की हा योगायोग आहे याची काही कल्पना नाही.