bedse caves
bedse cavesEsakal

Premium|Historical Places: बेडसे लेणं हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर काळाच्या दगडांमध्ये साठवलेलं अज्ञात इतिहासाचं स्पंदन

Bedse Leni: कोणत्या अज्ञात कारागिरानं या निर्जन कातळाला बोलकं केलं? हे शिल्प कधी आणि का घडलं? ही मूर्ती कोणाची?
Published on

लयनकथा । अमोघ वैद्य

बेडसे लेणं म्हणजे केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर त्या काळाच्या दगडांमध्ये साठवलेलं अज्ञात इतिहासाचं स्पंदन आहे. या लेण्याची ओळख अजूनही फारशा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. बहुतेक वेळा कार्ले-भाजे लेण्यांच्या प्रकाशात बेडसे लेणं अंधारात राहतं. पण म्हणूनच इथं भेट देणं म्हणजे एका शांत, स्वच्छ आणि अप्रत्यक्ष अनुभवाशी जोडलं जाणं आहे.

सह्याद्रीच्या कड्याकपारींत, कधी कामाच्या गडबडीत घाटवाटा चढताना, तर कधी प्राचीन किल्ल्याच्या कहाण्यांच्या ओढीनं पायवाटा धुंडाळताना आपण क्षणभर थांबतो. थकलेले पाय एखाद्या कड्याच्या कठड्यावर विसावतात आणि नजर निसर्गाच्या सौंदर्यात हरवते. तेव्हाच कातळाच्या गर्भात कोरलेली, पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारलेली एखादी नाजूक कमान आपलं लक्ष वेधून घेते, किंवा जणू काळाच्या गहन गर्तेतून उगवलेली एखादी शिल्पमूर्ती मनाला मोहिनी घालते.

त्या क्षणी मन प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडतं! हे एवढं मोठं वैभव कोणी रचलं? कोणत्या अज्ञात कारागिरानं या निर्जन कातळाला बोलकं केलं? हे शिल्प कधी आणि का घडलं? ही मूर्ती कोणाची? या दुर्गम वाटेवर हे सौंदर्य का अवतरलं असेल? असे असंख्य प्रश्न मनाला भुरळ घालतात. तिथली शांतता जणू काळाच्या कानात कुजबुजत आपल्याला इतिहासाच्या गूढ विश्वात घेऊन जाते. अशाच एका रम्य पायवाटेवर भटकण्याची हौस असेल, तर पवना खोऱ्यात लपलेलं ‘बेडसे’ नावाचं कातळशिल्प तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना या मावळच्या गडदुर्गांच्या मध्यभागी बेडसे हे एक रम्य लेणं शांतपणे वसलं आहे. मुंबई-पुण्यातील अनेकांना कार्ले, भाजे किंवा कोंडाणे यांसारख्या नामांकित लेण्यांची ओळख आहे, पण बेडसे लेण्याकडे वळणारे पाय फारच थोडे. इथं कार्ले-भाजेसारखी पर्यटकांची झुंबड नाही, त्यामुळे हे लेणं नीरव शांततेत आपलं सौंदर्य अधिक वाढवून आहे.

पुणे जिल्ह्यात पवना नदीच्या खोऱ्यातल्या सुमती डोंगरावर, साधारण १०० मीटर उंचीवर हे लेणं खोदलं गेलं आहे. कामशेत गावापासून फक्त ८ ते १० किलोमीटर अंतरावर असलेलं हे लेणं पवना धरणाकडे जाणाऱ्या वाटेवर उजव्या बाजूच्या डोंगरात एका गोलाकार खोलगट रूपानं डोळ्यांत भरतं. हा खोलगट भाग म्हणजे बेडसे लेण्यातलं मुख्य चैत्यगृह!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com