लयनकथा । अमोघ वैद्य
इथल्या एका शिल्पात गती आहे. एका धावत्या रथात राजा आणि त्याच्या दोन स्त्रिया (एक छत्र धरलेली, दुसरी चामर), तसंच घोड्यावर स्वार झालेल्या स्त्रिया दिसतात. रथाची चाकं आणि घोड्यांच्या हालचालींमधून गतिमानता प्रकट होते.
महाराष्ट्र हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशांचा खजिना असलेला प्रदेश. सह्याद्री त्याच्या उंच डोंगररांगांत अनेक प्राचीन कथा जपून आहे. याच प्रदेशात अजिंठा, वेरूळ, कार्ले आणि भाजे यांसारख्या अनेक लेण्या कोरल्या गेल्या. भारतात जवळपास अठराशे लेण्या आहेत; त्यातल्या महाराष्ट्राचं वैभव बघा, अठराशेमधल्या अकराशे लेण्या एकट्या महाराष्ट्रातच आहेत. बौद्ध, हिंदू आणि जैन या स्थापत्यांचं विलक्षण अळंकरण इथं दिसतं आपल्याला.
प्राचीन व्यापारी मार्गांनी नटलेल्या या भूमीत काळाच्या प्रत्येक पावलावर इतिहास भेटतो. मावळ तालुक्यातल्या लोणावळ्याच्या हिरव्या खोऱ्यात वसलेलं भाजे गाव एक अलंकृत इतिहास उराशी बाळगून आहे. लोणावळा आणि खंडाळ्याच्या निसर्गसौंदर्यात, तसंच लोहगड आणि विसापूरच्या बुलंद इतिहासात मग्न असं गाव भाजे लेण्यांचं प्रवेशद्वार आहे. ह्या लेण्या म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचा पहिला आवाज.