डॉ. राहुल हांडे
उत्तर भारतात गंगा-जमनी संस्कृतीचा उदय व विकास झाला तरी हिंदू धर्मातील वर्ण-जात-वंश हे भेद पार करत हिंदू धर्माला एकजिनसी करण्यात अथवा उदार करण्यात मध्ययुगीन उत्तर भारतीय भक्ती आंदोलनांना यश मिळू शकले नाही. महाराष्ट्रात मात्र भक्ती आंदोलनांनी पुरोगामी म्हणून महाराष्ट्राची कायमची ओळख निर्माण केली.
अकराव्या-बाराव्या शतकात दक्षिण भारतात अलवार भक्ती आंदोलनाची मशाल प्रज्वलित झाली. महाराष्ट्रात नाथ, महानुभाव व लिंगायत संप्रदायांनी अलवारांच्या पुढे पाऊल टाकत भक्ती आंदोलनांना संपूर्ण क्रांतीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. या संप्रदायातील प्रबोधनांची व सुधारणांची धग हजारो वर्षांची सामाजिक व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिकतेला पेलवणारी नव्हती.