

Biryani Spices
esakal
प्रत्येक मसाल्याचे खास असे वैशिष्ट्य असते. एखादा मसाला बिर्याणीला सुगंध देतो, तर एखाद्यामुळे बिर्याणी मसालेदार होते. आणखी एखाद्यामुळे तिला रंग येतो, तर दुसरा तिला ‘शाही’ करून टाकतो. या सर्वांचीच तिला गरज असते. एकट्या मसाल्यानेच ती स्वादिष्ट होत नाही. ते एक प्रकारचे टीम वर्क आहे.
बिर्याणी!! नाव ऐकताच खाण्याची इच्छा होते ना? तिचा सुगंध आणि चव आपल्या मनाचा व जिभेचा पूर्ण ताबाच घेते. बिर्याणी हे भारतातील एक लोकप्रिय आणि पारंपरिक व्यंजन आहे. तांदूळ, मांस, भाज्या व सुगंधित मसाले वापरून हा पदार्थ तयार केला जातो.
हा पदार्थ जसा स्वादिष्ट आहे तसाच तो पौष्टिकही आहे. याचा आस्वाद फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात घेतला जातो. बिर्याणी करणे ही एक कलाच आहे. बिर्याणी करताना संयम आणि धैर्य यांची कसोटी लागते. पण त्याचा शेवट खूप स्वादिष्ट असतो, मनाला एक समाधान देऊन जातो. जसा एखादा संगीतकार निरनिराळी वाद्ये वापरून एक सुंदरशी संगीत रचना करतो, तसाच एखादा शेफ निरनिराळे मसाले वापरून एक स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार करतो. ती करताना त्यातल्या मसाल्यांना आणि त्यांच्या प्रमाणाला खूप महत्त्व असते. एका लहानशा चुकीमुळे संपूर्ण हंडी बिघडू शकते. साधारणपणे सोळा ते सतरा मसाल्यांचे पदार्थ बिर्याणीसाठी वापरले जातात. व्हेज व नॉनव्हेज बिर्याणीसाठी यांचे प्रमाण वेगवेगळे असते. आता आपण शेफच्या नजरेतून या मसाल्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ.