Bladder cancer
Esakal
आरोग्य। डॉ. राजेंद्र शिंपी
मूत्राशय हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असून, तो मूत्र साठवण्याचे कार्य करतो. या अवयवाचा कर्करोग हा जगभरात वेगाने वाढणारा आजार आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि विविध संशोधन अहवालांनुसार, मूत्राशयाचा कर्करोग हा जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग मानला जातो. त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती होणे अत्यावश्यक आहे.
मूत्राशयाच्या कर्करोगाबाबतीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्या निदानाची वेळ. जर हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला आणि तो फक्त मूत्राशयापुरता मर्यादित असेल, तर उपचारांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. लवकर निदान झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी जवळपास ७६ टक्के रुग्ण पाच वर्षांहून अधिक काळ जगतात, असे संशोधनात दिसून आले आहे. पण, जर कर्करोगाचे उशिरा निदान झाले, हा कर्करोग इतर अवयवांपर्यंत पसरला किंवा आसपासच्या पेशींना त्याचा संसर्ग झाला, तर परिस्थिती गंभीर व गुंतागुंतीची होते. अशा वेळी रुग्ण पाच वर्षे जगण्याचे प्रमाण केवळ २१ टक्के असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे.
मूत्राशयाच्या कर्करोगाचे प्रकार वैद्यकीयदृष्ट्या वेगवेगळे असतात. त्यामध्ये प्रमुख प्रकार म्हणजे ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा. हा प्रकार सर्वाधिक आढळतो. तसेच स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि अॅडिनोकार्सिनोमा हे इतर प्रकारदेखील निदर्शनास येतात. वेगळा प्रकार असला, तरी मूळ आव्हान एकच आहे, ते म्हणजे वेळेत निदान आणि त्वरित उपचार.