नेहा लिमये
ब्लूज अवचितपणे काळाच्या एका तुकड्यातून जन्माला आलेलं असलं, तरी त्याच्या असण्यानं काळाचे अनंत सांदी-कोपरे उजळून निघाले. म्हणून सच्च्या संगीतप्रेमीनं ब्लूज ऐकावं, ऐकत राहावं.. सुखात असताना दुखणं, खुपणं, वेदना म्हणजे काय हे कळण्यासाठी आणि दुःखात असताना वेदनेला आनंदानं कसं सामोरं जावं हे कळण्यासाठी!
एखादा संगीतप्रकार कुठून, कसा जन्माला येईल सांगता येत नाही. एकदा असंच झालं. १८६५चं सिव्हिल वॉर संपून गुलामगिरीचा कागदोपत्री अंत झाला होता. पण एकोणिसावं शतक सुरू होऊन मध्यावर आलं, तरी आफ्रिकन-अमेरिकन लोकांसाठी स्वातंत्र्याची संकल्पना शेकडो योजनं लांब होती. दिवसभर शेतावर मजुरी करत राबायचं. गोऱ्या मालकाची जुलुमशाही सहन करायची. दोन वेळच्या अन्नाचीही भ्रांत. अनन्वित कष्ट आणि अत्याचार.