Breast Feeding :या सात गोष्टींनी स्तनपान होईल सुलभ

Breast Feeding
Breast Feedingesakal

डॉ. दिशा शहा

मातृत्व हा एक अत्यंत सुखद अनुभव आहे. स्तनपान हा बाळाच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचा पाया आहे. त्यामुळेच त्यातील समस्यांवर मात करणे, हे आईच्या व बाळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. ह्यातील सर्व समस्यांवर फिजिओथेरपीच्या साहाय्याने सहज मात करणे शक्य आहे.

स्तनपान हा मातृत्वाचा एक सुंदर आणि आवश्यक पैलू आहे, ज्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही अनेक फायदे मिळतात. तथापि, नव्याने आई झालेल्या बऱ्याचजणींसाठी हे निराशा आणि चिंतेचे कारणदेखील असू शकते. नवीन मातांना जाणवणाऱ्या स्तनपान विषयक अडचणी सोडविण्यासाठी व स्तनपानाचा अनुभव निरामय आणि आनंददायी बनवण्यात फिजिओथेरपिस्ट प्रभावी तंत्रांचा अवलंब करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. काही नवीन मातांना जाणवत असलेल्या स्तनपानासंबंधी समस्यांवर चर्चा करू.

स्तनपान ही एक नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे, परंतु बऱ्याचदा नवीन मातांना सहजी अंगवळणी पडतेच असे नाही. या काळातला प्रत्येक स्त्रीचा प्रवास अनोखा असतो आणि तो नीट होण्यासाठी एकच एक असा कुठलाही उपाय नसतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तथापि, योग्य मार्गदर्शन आणि तंत्राच्या मदतीने स्तनपानाविषयक अनेक समस्यांवर मात करता येते. फिजिओथेरपिस्ट लोकांना त्यांच्या शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करण्यात कुशल असतात. स्तनपान दिल्यामुळे मातांना अनेक प्रकारे कसा फायदा होतो, हे फिजिओथेरपिस्ट उत्तमप्रकारे सांगू शकतात. फक्त बाळाला दूध पाजण्यापुरतेच नाही तर त्याच्या पलीकडे जाणारे विविध फायदे आहेत. स्तनपान दिल्याने आईचे शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारू शकते. बाळाला जन्म दिल्यानंतर वजन कमी करणे, तणाव कमी करणे, पेल्विक फ्लोअरचे (ओटीपोट) आरोग्य राखणे आणि इतरही काही बाबींवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

स्तनपानातील काही आव्हाने

  • वेदना आणि अस्वस्थता : नवीन मातांना जाणवणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्तनपानादरम्यान होणाऱ्या वेदना आणि अस्वस्थता. स्तनावर बाळाची पकड (लॅचिंग) न येणे, स्तनाग्रांना कोरडेपणा (Dryness) येणे. बाळाला स्तनपान देतानाची आईची योग्य पोझिशन आणि स्तनावर बाळाची पकड घट्ट होण्यासाठीचे तंत्र आईला शिकवणे महत्त्वाचे ठरते. स्तनाग्रांचे दुखणे टाळण्यासाठी बाळाच्या तोंडाने स्तनाग्रांचा शक्य तितका भाग झाकलेला असल्याची खात्री करावी. वेदना होत असल्यास योग्य स्थितीबाबत मार्गदर्शनासाठी फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा.

  • दूध कमी येणे : बाळाची भूक भागण्यासाठी पुरेसे दूध तयार होतेय की नाही याची काही नवीन मातांना काळजी वाटते. पण वारंवार आणि प्रभावीपणे केलेल्या नर्सिंगमुळे दूध पुरवठा वाढण्यात मदत होऊ शकते. यासाठी खूप पाणी पीत राहणे आणि पुरेशी विश्रांती घेणेही महत्त्वाचे ठरते.

  • स्तनांचा घट्टपणा: स्तन सुजलेले आणि कडक असतील, वेदना होत असतील, तर स्तनपान देणे कठीण होऊ शकते. अशावेळी स्तनांचे स्नायू नरम करण्यासाठी स्तनपान देण्यापूर्वी गरम पाण्याचा शेक घ्यावा. हळुवारपणे मसाज करून घट्टपण कमी करण्यास मदत होऊ शकते. स्तनामध्ये दूध साठून राहू नये यासाठी बाळ योग्यरित्या लॅच करत असल्याची खात्री करावी.

  • स्तनदाह : स्तनामध्ये झालेल्या इन्फेक्शनमुळे स्तनदाह होऊ शकतो. यामध्ये वेदना, सूज आणि कधीकधी फ्लूसारखी लक्षणे दिसतात. अशावेळी डॉक्टरांना विचारून स्तनपान सुरू ठेवावे, कारण दूध साठून राहणे योग्य नाही. विश्रांती घ्यावी, गरम पाण्याचा शेक घ्यावा आणि आवश्यक असल्यास प्रतिजैविके (Antibiotics) घ्यावीत, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. स्वतःच ठरवून कोणतीही औषधे घेणे, स्तनपान थांबवणे असे काही करू नये.

  • बाळाची कमी पकड व त्यामुळे होणारे त्रास : स्तनपान देताना योग्य पद्धतीने न दिल्यास वेदना होऊ शकते आणि बाळाची वाढ कमी होऊ शकते. त्यामुळे स्तनपान देताना बाळाचे तोंड उघडे आहे ना आणि ओठ बाहेरील बाजूने उघडलेले असल्याची खात्री करावी. लॅचिंग नीट होते आहे ना, यासाठी फिजिओथेरपिस्टची मदत घेता येऊ शकते.

  • स्तनाग्रे दुखणे : स्तनाग्रे दुखावली गेली असल्यास स्तनपान देण्यास त्रास होऊ शकतो. दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी तज्ज्ञांना विचारून क्रीम किंवा आईचे दूध लावावे. ब्रेस्ट पम्प किंवा आर्टिफियल निपलचा वापर जपून करावा, कारण त्यामुळे स्तनाग्रे दुखावली जाऊ शकतात आणि स्तनपानात व्यत्यय येऊ शकतो. पुढील दुखापत टाळण्यासाठी बाळाने योग्यरित्या लॅच करणे महत्त्वाचे आहे.

प्रभावी स्तनपान तंत्र

  • योग्य पोझिशनिंग : योग्य पोझिशनिंग हा यशस्वी स्तनपानाचा पाया आहे. बाळाला शरीराजवळ धरावे. त्याचे डोके स्तनाजवळ ठेवावे. बाळाच्या तोंडाने शक्य तितके स्तनाग्र झाकलेले असल्याची खात्री करावी.

  • वारंवार आहार देणे: नवजात बालकांचे पोट लहान असते आणि त्यांना वारंवार आहार देणे आवश्यक असते, सामान्यतः दर दोन-तीन तासांनी आहार द्यावा. बाळाच्या मागणीनुसार आहार दिल्यास दूध पुरवठा चांगला होण्यास मदत होते.

  • स्तन दाबणे : जर तुमच्या बाळाला स्तनपान करताना झोप येत असेल किंवा नीट पकडता येत नसेल, तर दूध वाहते राहण्यासाठी स्तन हळूवारपणे दाबावे.

  • दोन्ही स्तनांवर पाजावे : जर बाळ एका स्तनावर दूध प्यायल्यानंतर असमाधानी दिसत असेल तर दुसऱ्या बाजूलाही पाजावे. असे केल्याने बाळाला पोषक दूध मिळेल. आईचे दूध भरपूर चरबीयुक्त आणि वाढीसाठी आवश्यक असते.

  • स्तनांची काळजी : फीडिंगदरम्यान स्तन स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. स्तनाग्रांवर साबण वापरणे टाळावे, कारण ते कोरडे पडू शकतात. त्याऐवजी कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे आणि कोरडे करावे.

  • हायड्रेशन आणि पोषण : मातांनी पाणी भरपूर प्यावे आणि दूध तयार होण्यासासाठी संतुलित आहार घ्यावा.

  • योग्य मदत घ्या : स्तनपानाबाबत काही अडचणी जाणवत असल्यास, स्तनपान सल्लागार व फिजिओथेरपिस्टची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये. ते वैयक्तिक मार्गदर्शन करू शकतात.

मातृत्व हा एक अत्यंत सुखद अनुभव आहे. मुलाच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचा स्तनपान हा पाया आहे. त्यामुळेच त्यातील समस्यांवर मात करणे, हे आईच्या व बाळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असते. ह्याच सर्व समस्यांवर फिजिओथेरपीच्या साहाय्याने सहज मात करणे शक्य आहे. स्तनपानाने आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण मातृत्वाच्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण व्हावा, यासाठी शुभेच्छा!

----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com