नववधू माहेरवाशिणीच्या अल्लड भावना.. मेंदीच्या पानावर..!

हृदयनाथांच्या सुरावटीवर लताबाईंनी गायल्याने ते आजही रसिकांच्या कानामनावर अधिराज्य करते आहे.
mehendichya panavar song
mehendichya panavar songesakal

हेमंत गोविंद जोगळेकर

मागच्या लेखांकातील शालू हिरवा... (सकाळ साप्ताहिक –प्रसिद्धीः १३ जानेवारी २०२४) या गीतात बोहल्यावर चढणाऱ्या युवतीची हुरहुर आपण पाहिली होती.

तिला एक नवा अनुभव पहिल्यांदाच घ्यायचा होता. या गीतातील नायिकेने हा अनुभव अगदी नुकताच घेतला आहे.

गीत आहे सुरेश भट यांचे मेंदीच्या पानावर... त्यांच्या रूपगंधा कवितासंग्रहात ‘माहेरवाशीण’ शीर्षकाने आलेले. त्याचेच काहीसे संक्षिप्त रूप हृदयनाथांच्या सुरावटीवर लताबाईंनी गायल्याने ते आजही रसिकांच्या कानामनावर अधिराज्य करते आहे.

ही माहेरवाशीण काही फार दिवसांनी माहेरी आलेली माहेरवाशीण नाही. विवाहानंतर एखाद्या रात्रीच्याच पतिसहवासानंतर ती बहुधा मांडव परतण्यासाठी माहेरी आलेली आहे. साहजिकच तिच्या मनात त्या नव्या अनुभवाच्या ‘भलत्यासलत्या’ आठवणी येताहेत!

ही नायिका कालपर्यंत अनाघ्रात होती. तिचे मन अजूनही अल्लडच आहे. ह्या तिच्या मनाला सुरेश भट ‘जाईच्या पानावर अजून झुलणारे’ या नाजूक प्रतिमेतून नेमके व्यक्त करतात. कालपर्यंत ज्या अनुभवाची केवळ स्वप्नेच पाहिली होती, त्याला सामोरे जाताना ती हलून गेली आहे.

तिच्या कोवळ्या तनुने घेतलेल्या भोवंडून टाकणाऱ्या या नव्या अनुभवात जसे सुख आहे तशी वेदनाही आहे - जसे जाईच्या उमळणाऱ्या कोमल पाकळ्यांना नव्याने स्पर्शणारे दवबिंदू सलावेत! रात्री अंगावर शिरशिरी उठवणारा जो गार वारा जाणवला होता, तोच आता पहाटे अंगणात झुळझुळतो आहे.

इथे सुरेश भट ‘वाऱ्याने अंगणातल्या तुळशीचा सारा देह हुळहुळतो आहे’ असे सांगतात ; पण त्यातून ते तिच्याच तनामनाची अवस्था दर्शवतात -तिच्या शालीनतेला थोडाही धक्का न लावता! लग्नात लावलेल्या हळदीने तिचे अंग अजूनही पिवळे आहे.

ही तरुणी आता विवाहित आहे. या अनुभवानंतर मोठीही झाली आहे. पण मोठेपणाचा कितीही आव आणू पाहिला तरी तिच्या डोळ्यातले बाल्य लपत नाही. तिच्या डोळ्यातले ते मोठेपण अजून कोवळे आहे.

त्याचा उल्लेख आपल्या मनात तिच्याविषयी वात्सल्यच निर्माण करतो -वासना नाही! गीताच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी येणारा ‘-गऽऽ’ गीताला अधिकच ‘गोऽड’ करतो!

इतका नाजूक अनुभव त्यात थोडेही हीण येऊ न देता व्यक्त करण्यासाठी सुरेश भट प्रतिमांचा उपयोग करतात. त्या नाजूक, सुंदर आणि मंगलही आहेत.

सुरेश भटांच्याच दुसऱ्या एका गीतातील प्रतिमा वापरून असेही म्हणता येईल की त्यांनी तिला ‘प्राजक्तासम टिपले’ आहे.

इतका कोमल अनुभव शब्दात पकडताना त्यातल्या कोवळिकीला धक्का लागण्याचा धोका असतो. तो बटबटीत होऊ शकतो. वाह्यात वाटू शकतो. पण तसे होऊ नये म्हणून सुरेश भट प्रतिमांच्या भाषेत बोलतात.

अनेक कवींनी असा अनुभव उत्तान वाटावा अशा तऱ्हेने कवितेत आणला आहे. अगदी केशवसुतांनीही ‘बायांनी धरूनी जिला निजबळे खोलीमध्ये..’ अशी रचना चक्क शार्दूलविक्रीडितात केली आहे.

स्वतः सुरेश भटांनी ज्ञातास्वाद पुरंध्रीचा कामभाव व्यक्त करणारी ‘मलमली तारुण्य माझे..’ किंवा ‘मालवून टाक दीप..’ सारखी गीते लिहिली आहेत. पण या गीतासम नाजूक गीत हेच!

सुरेश भटांनी आधुनिक मराठी गझलेची मुहूर्तमेढ रोवली. गझलचा हिरीरीने पुरस्कार केला आणि गजलेचे तंत्र आणि मंत्र गझलकारांच्या आख्या पिढीला शिकवले. पण त्यांच्या कविताही तितक्याच समर्थ आहेत. हे गीत हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे!

मेंदीच्या पानांवर

मन अजून झुलते ग

अजून तुझे हळदीचे

अंगअंग पिवळे ग

अजून तुझ्या डोळ्यांतिल

मोठेपण कवळे ग

आज कसे आठवले

बघ तुलाच भलते ग

मेंदीच्या पानांवर

मन अजून झुलते ग

झुलते ग!

------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com