डॉ. अविनाश भोंडवे
उशिरा होणारे निदान, आरोग्यसेवेचा अभाव, चाचण्यांविषयीची भीती आणि अज्ञान या कारणांमुळे कर्करोगाचा मृत्युदर वाढतो. मात्र, कर्करोगाची लक्षणे दिसण्याआधी ट्यूमर मार्करच्या रक्तचाचण्या प्राथमिक निदान करू शकतात. प्रोस्टेट, डिम्बग्रंथी, अंडाशय, फुप्फुस, यकृत यांसारख्या विविध कर्करोगांसाठी पीएसए, सीए-१२५, एचसीजी, एएफपी, सीईए अशा चाचण्या उपयुक्त ठरतात.
भारतात दरवर्षी सुमारे १५ लाख व्यक्तींना कर्करोग होतो असे गेल्या दोन-तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. तर, ९ ते ९.५ लाख रुग्ण कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. आरोग्यसेवेचा अभाव, अज्ञान, चाचण्यांची भीती यामुळे कर्करोगाचे निदान टाळणाऱ्या आणि कर्करोगाला बळी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या यात मिळविल्यास ती कदाचित आणखी ५० टक्क्यांनी वाढेल.
कर्करोगाचे प्राथमिक निदान साधारणतः कर्करोगाची गाठ दिसू लागल्यावर होते. उदाहरणार्थ, स्तनाचा कर्करोग किंवा काही विपरीत लक्षणे दीर्घकाळ आढळल्यावर होते. तसेच, फुप्फुसांचा किंवा आतड्यांचा कर्करोगाचे बहुसंख्यवेळा आजार वाढल्यानंतर निदान होते.