

Carlos Alcaraz Australian Open 2026
eskal
किशोर पेटकर
मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम अल्काराझने सर्वांत कमी वयात साधला. २२ वर्षे व २७२ दिवसांचा असताना ‘करिअर ग्रँडस्लॅम’चा मान मिळविणारा तो सर्वांत युवा ठरला आहे. अल्काराझचाच देशवासीय महान टेनिसपटू राफेल नदालने २०१०मध्ये अमेरिकन ओपन जिंकले आणि २४ वर्षे व १०१ दिवसांचा असताना ‘करिअर ग्रँडस्लॅम’ला गवसणी घातली होती.
स्पेनचा विक्रमी टेनिसपटू कार्लोस अल्काराझ २०२६मध्ये जोमदार फॉर्मसह टेनिस कोर्टवर उतरला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर लगेच दोहा येथे झालेल्या कतार ओपनमध्ये या प्रतिभावान खेळाडूने बाजी मारली. निर्विवाद वर्चस्व राखताना सर्वांगसुंदर प्रेक्षणीय गुणवत्तेचे प्रदर्शन घडविले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या या स्पॅनिश टेनिसपटूने अवघ्या पन्नास मिनिटांत कतार ओपन किताबाला गवसणी घातली. या वर्षातील पुरुष टेनिसमधील ही कमी वेळेत संपलेली एकतर्फी अंतिम लढत ठरली. फ्रान्सचा आर्थर फिल्स अल्काराझच्या झंझावाती खेळाचा सामना करू शकला नाही. गतवर्षी कतार ओपनमध्ये अल्काराझचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. यावेळी आक्रमक खेळास त्याने विजयाची जोड दिली. अंतिम लढतीत आपल्या सर्व्हिसवर फिल्सला एकही ब्रेक पॉइंट त्याने मिळू दिला नाही. कतार ओपन जिंकल्यानंतर अल्काराझने आपले ध्येय स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘‘यावर्षी मी अधिक जास्त भुकेलेलो आहे. केवळ करंडक जिंकणेच माझ्यासाठी सफलता नाही, तर आता माझे व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदललेले आहे, ज्याचा भर अखंडित सुधारण्यावर आहे.’’ याचाच अर्थ स्वतःतील उणिवा शोधून यशस्वी होण्यासाठी अल्काराझने झोकून घेतलेले आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन ओपननंतर कतार ओपनमध्येही तो सुसाट ठरला.