रिपोर्ताज । संजय करकरे
मे महिन्यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत १५ बळी गेले. तेंदू पान तोडणाऱ्या महिलांपासून गुराख्यांपर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. व्याघ्र संवर्धनाच्या यशाखाली दडलेली मानवी वेदना, सुरक्षिततेच्या अपुऱ्या उपाययोजना आणि स्थानिकांचा संताप यांचा पट मांडणारा रिपोर्ताज...
पहिली घटना : १० मे २०२५
चारगावमधील पन्नाशीच्या जवळपास असणारी वंदना गजभिये पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आवरून तयार झाली होती. तेंदू पानांचा हंगाम सुरू होऊन दोन दिवस झाले होते. कालप्रमाणं आजही चांगली पानं मिळावीत यासाठी तिची ही धडपड. केवळ दहा कुडवाच्या शेतातून फारसं काही हाती लागणार नाही याची तिला जाणीव होती. वंदनासह आजूबाजूच्या पाच-सहा बायका एकत्र आल्या. सोबतीला दोन पुरुषही होते.
गावापासून जंगलाच्या दिशेनं हा गट झपाझप रस्ता काटू लागला. तेंदू पान तोडणी सुरू होऊन दोन दिवस झाल्यामुळं जवळच्या जंगलातली पानं संपली होती. आता दाट जंगलात जावं लागणार असा विचार करत हा गट वेगानं पावलं टाकत होता. त्या गटातल्या तिघीजणींनी डोंगरगाव बीटच्या मोठ्या जंगलात प्रवेश केला आणि सवयीनुसार त्या चहूबाजूला पांगल्या.
लहान पानं, मध्यम पानं दोन्ही हातांनी पकडून, तोडून पोटाला बांधलेल्या साडीत, पोत्यात त्या जमा करू लागल्या. साधारण नऊ वाजेपर्यंत त्या तेंदू पानं तोडत होत्या. जवळच्या पोत्यांतील पानांचं वजन जाणवू लागलं तसं त्यांनी घरची वाट धरली. नेहमीप्रमाणं त्या एका रांगेत चालत होत्या. सर्वात शेवटी वंदना आपल्या खांद्यावर पोतं ठेवून चालत होती. अचानक मागून वाघानं वंदनाच्या अंगावर झेप घेतली. वाघाच्या पंजाचा एकच फटका वंदनाच्या डोक्यावर बसला.