

Challenges of One Child Policy Legacy
esakal
लोकसंख्येच्या बळावर मोठ्या झालेल्या देशाने लोकांची संख्या नियंत्रणात आणल्यावर काय अडचणी येऊ शकतात, याचे चीन हे उदाहरण आहे. चीनमध्ये अनेक दशकांच्या विविध धोरणांतून लोकसंख्या कमी करण्याचे प्रयोग झाले. त्यामुळे मागील काही वर्षांत येथील लोकसंख्येची रचना झपाट्याने बदलत असून, वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या आणि घटता जन्मदर हे या देशाच्या आर्थिक व सामाजिक व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान ठरत आहेत.
गेल्या काही दशकांत चीनने आपल्या भल्यामोठ्या लोकसंख्येचा उपयोग करून घेत वेगवान आर्थिक प्रगती साधली. कमी रोजगारात काम करणारा मुबलक कामगारवर्ग, मोठा ग्राहकवर्ग आणि उत्पादनक्षम तरुण लोकसंख्या ही चीनच्या औद्योगिक विकासाची प्रमुख ताकद होती. मात्र आता या देशातील लोकसंख्येचे प्रमाण बदलले असल्याने आर्थिक विकासात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. एकूण लोकसंख्येत वृद्ध व्यक्तींचे प्रमाण वाढणे आणि नवजात बालकांचे व कार्यक्षम मनुष्यबळाचे प्रमाण घटणे, याचा चीनच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आशियातील इतर देशांसह भारतासाठीही या घडामोडींचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.