china
Esakal
अनुराधा मोहन शेडगे
चीनची सहल म्हणजे एक आगळीवेगळी अनुभूती. कधी ग्रेट वॉलवरून चालताना भूतकाळ उमगतो, तर कधी बुलेट ट्रेनमधून प्रवास करताना भविष्याचा वेग अनुभवता येतो. यावरून एक समजतं, की चीन हा केवळ प्रवासाचा देश नाही, तर प्रत्येक प्रवाशाला विचार करायला लावणारा, प्रेरणा देणारा आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा अनुभव आहे!
प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर त्या ठिकाणाच्या व्हाइब्ज अनुभवणं... जर तुम्हाला इतिहासाची भव्यता, संस्कृतीची समृद्धी, निसर्गाची अद्भुतता आणि आधुनिकतेची झपाटलेली गती हे सगळं एका प्रवासात अनुभवायचं असेल, तर चीनपेक्षा उत्तम ठिकाण नाही. भारतापासून अगदी काही तासांच्या विमान प्रवासावर असलेला हा विशाल देश प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी वेगळं घेऊन उभा असतो.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे चीनची ‘ग्रेट वॉल’. हजारो किलोमीटर पसरलेली ही भिंत फक्त दगडांची एक रचना नाही, तर शतकानुशतकांच्या संघर्षाची कहाणी सांगणारी भव्य वास्तू आहे. डोंगररांगांवरून पसरलेली ही भिंत पाहताना प्राचीन चीननं आपलं साम्राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची भव्य झलक समोर उभी राहते.