सारंग खानापूरकर
भविष्यातील धोके अधिक गडद असतील, याचा इशारा विविध शास्त्रीय पुरावे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल सातत्याने देत आहेत. भारतानेही आता निर्णायक पावले उचलत आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा करणे, हवामान अनुकूल पायाभूत सुविधा उभारणे आणि मुख्य म्हणजे हवामान बदलामुळे होणाऱ्या स्थलांतराबाबत धोरण तयार करणे गरजेचे आहे.
जगभरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरांमागे मानवी संघर्ष हे एकमेव कारण नाही. हवामान बदलामुळे भौगोलिक स्थितीत बदल होऊन लोकांना राहते घर सोडून आपल्याच देशात इतरत्र किंवा दुसऱ्या देशांमध्येही स्थलांतरित व्हावे लागत असल्याच्या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे हवामान बदल ही केवळ एक पर्यावरणीय समस्या राहिलेली नसून, मानवी स्थलांतराला कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून ठळकपणे समोर येत आहे.
अतिवृष्टी, चक्रीवादळ, समुद्रपातळीत वाढ, प्रदीर्घ काळ लांबलेली दुष्काळस्थिती, पूर, वाळवंटीकरण अशा नैसर्गिक घटनांनी लाखो लोकांना अस्थिर केले आहे. आगामी काळात ही समस्या आणखीनच गंभीर होणार असल्याचा अंदाज आंतरसरकारी हवामान बदल समितीने तयार केलेल्या अहवालात देण्यात आला आहे. भारतासारख्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात लोकांचे स्थलांतर हे सध्यातरी प्रामुख्याने रोजगारापुरते मर्यादित असले, तरी हवामान बदलाच्या समस्येबाबत कोणताही देश अपवाद नाही.