

Girnar Mountain Junagadh
esakal
कमानीपर्यंत जाणाऱ्या उतरत्या पायऱ्यांनी मात्र खरोखरच माझी परीक्षा बघितली. कारण जोरदार वारा, पाऊस आणि धुकं. वारं तर इतकं जोरात होतं की आता उडून जाऊ की काय असं वाटत होतं. समोरून परत येणारे ‘लवकर जा मंदिर बंद होईल,’ असं सांगत होते. कुणी मंदिर सहाला बंद होतं, कुणी सात तर कुणी मंदिर उघडंच असतं असंही सांगत होतं. लवकर लवकर पावलं उचलावीत असं मला वाटत होतं, पण धुक्यामुळे दिसत नव्हतं...!
ध्यानीमनी नसताना अचानक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात गिरनारला जायची संधी मिळाली, ती सोनाली आणि वैशाली या दोन मैत्रिणींमुळे. त्या दोघी आणि आणखी सहाजणी असा आठजणींचा ग्रुप गिरनार परिक्रमेला जायचा होता. मीही गेली दोन वर्षं गिरनार पर्वत चढायचा म्हणून घोकत होतेच. यावेळी मात्र जाणार नव्हते. पण बहुधा योग होताच, त्यामुळे त्यांनी मला ओढूनच नेलं. सरतेशेवटी ३० तारखेला संध्याकाळी पुण्यातून दादर, तिथून मुंबई सेंट्रल, तिथून दुरान्तोने राजकोट. राजकोटहून वंदे भारतने जुनागढ. कुठल्याही स्टेशन्सवर आम्हाला कुठेही एस्कलेटर मिळाले नाहीत. त्यामुळे सगळीकडे बॅगा घेऊन चढा-उतरा. शेवटी शेवटी गमतीने आम्ही म्हणायचो की गिरनार पर्वत चढायचा आहे ना, म्हणून प्रॅक्टिस करतोय आपण. अर्थातच अपुरी झोप, दूरच्या प्रवासात ट्रेनमधून अधल्यामधल्या स्टेशनला उतरणारे, चढणारे प्रवासी, त्यांच्या गप्पा, मोबाईलवर मोठ्या आवाजातच रिल्स बघणारे, ऐकणारे लोक अशा सगळ्या गदारोळात दुरान्तोचा प्रवास पार पडला आणि दुरान्तोने सकाळी ८.३० वाजता आम्हाला राजकोटला सोडलं. तिथून वंदे भारतने जुनागढला पोहोचलो.