

Konkan Coastal Journey
esakal
माणसाला अज्ञाताचं फार मोठं कुतूहल असतं. अज्ञाताचंच कशाला? अगदी नित्यनव्यानं होणारा सूर्योदय, अवचित उमटणारं इंद्रधनुष्य असे निसर्गाचे आनंद विभ्रम अनुभवताना, माणसं वाचताना, निसर्ग समजून घेताना हे कुतूहल मनातून हलकेच डोळ्यात उतरतं आणि दुनिया रंगीन करून टाकतं. हा कुतूहलाचाच रंग माणसाच्या जगण्याचा पोत सुधारतो.
दक्षिणायनाला चार महिने उलटून गेले होते. मोठ्या रात्रींचे छोटे दिवस सुरू झाले होते. सूर्य लवकर मावळे. सहा वाजल्यानंतरच सारं अंधारात गुडूप होऊन जाई. हलक्याशा थंडीचीही चाहूल लागू लागली होती. पश्चिमेकडच्या थंड देशातून पूर्वेकडच्या उबदार देशात येणाऱ्या एक-दोन प्रकारच्या पक्ष्यांचंही दर्शन घडू लागलं होतं.