

Comet Orchid and Hawk Moth
esakal
डॉ. मंदार दातार
लाखो वर्षांत गगनजाईने हॉक मॉथशी जे अतूट नाते जोडले, तीच जवळीक आज दुराव्याचे कारण झाली आहे. एकाच परागवाहकावर अवलंबून राहणे ही कधीकाळी उत्क्रांतीची ताकद होती. त्याच वैशिष्ट्यामुळे परागीभवन नेमके आणि कार्यक्षम होते आणि इतर कीटक मकरंद चोरू शकत नव्हते. पण आपला हक्काचा परागवाहक जेव्हा अदृश्य होतो, तेव्हा ती ताकद कमतरता होते.
इ.स. १८६२. इंग्लंडमध्ये चार्ल्स डार्विन आपल्या अभ्यासिकेत बसला आहे. त्याच्यासमोर वनस्पतींचे नमुने असलेली एक पेटी आहे. ऑर्किडसंग्राहक जेम्स बेटमन यांनी मादागास्करहून पाठवलेली ही पेटी ऑर्किडच्या फुलांच्या नमुन्यांनी भरलेली आहे. पेटीतून एक अनन्यसाधारण फूल डार्विनच्या हातात येते. अँग्रायकम सेस्क्विपेडाले (Angraecum sesquipedale) असे लंबेचौडे शास्त्रीय नाव असलेले व एखाद्या धूमकेतूच्या शेपटासारखी लांब नळी असलेले हे फूल आहे, त्यामुळे ते ‘कॉमेट ऑर्किड’ म्हणवले जाते. त्याची मकरंदनळी (स्पर) तब्बल ३० सेंटिमीटर लांब आहे. लुई-मारी ऑबेर द्यू पतीत-तुआर या अगडबंब नावाच्या फ्रेंच वनस्पतितज्ज्ञाने डार्विनच्या हातात हे ऑर्किड पडायच्या चाळीस वर्षे आधीच या फुलाला शास्त्रीय नाव दिले आहे. मात्र ते नाव देतानाच ही मकरंदनळी तब्बल दीड फूट लांब आहे (सेस्क्विपेडाले म्हणजे दीड फूट), हे वैशिष्ट्य या ऑर्किडच्या नावातच नोंदवून ठेवले आहे. डार्विन हे फूल पाहतो, आश्चर्यचकीत होतो आणि आपला मित्र व रॉयल बोटॅनिक गार्डन, क्यूचे संचालक असलेल्या जोसेफ हूकर यांना पत्र लिहितो. ‘‘गुड हेवन्स, व्हॉट इन्सेक्ट कॅन सक इट?’’ (अरे देवा, या फुलाचे परागीभवन कोणता कीटक करत असेल?)