बाळाची वाढ पहिल्या वर्षभरात खूप वेगानं होत असते आणि ही वाढ आणि विकास खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळ पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यामुळेच आईचा आहार परिपूर्ण, सर्व पोषकद्रव्यं पुरवणारा हवा!
शिवालीच्या नवऱ्याचा, सौरभचा, ‘आनंदाची बातमी’ द्यायला फोन आला. मुलगा झाला होता त्यांना. आता बाळाच्या पोषणासाठी काय आणि कशी काळजी घ्यायची याचं मार्गदर्शन त्यांना हवं होतं. काही गोष्टी मी फोनवर लगेचच सांगितल्या... ‘‘आता तासाभराच्या आत बाळाला आईचं दूध सुरू करायला हवं. तुम्हाला माहीतच आहे, पहिले तीन-चार दिवस जरा घट्ट चिकाचं दूध येतं. त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. थोडं कमी प्रमाणात असलं तरी ते पुरेसं असतं. त्यात भरपूर पोषक घटक असतात.
बाळाला ते पाजलं की बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि एक लक्षात ठेवा, बाळाला मध, सुवर्ण चाटण किंवा गुटी असं वरचं काहीही द्यायचं नाही हं! बाळाला संसर्ग होऊ शकतो. पोट बिघडू शकतं. रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. बाळ अशक्त होऊ शकतं आणि त्याचं वजनही कमी होऊ शकतं.
डॉक्टरांनी औषध किंवा व्हिटॅमिन, मिनरलचं सप्लिमेंट म्हणून काही ड्रॉप्स किंवा सिरप द्यायला सांगितलं असेल, तर तेवढं फक्त बाळाला वेळच्यावेळी द्यायला हवं. सुरुवातीला दर दीड-दोन तासांनी बाळाला पाजायला हवं. एकदा व्यवस्थित दूध यायला लागलं आणि आई व बाळाचं सूत जमलं, की बाळ जेव्हा मागेल तेव्हा त्याला दूध द्यायला हवं; दिवसा आणि रात्रीसुद्धा!’’ असं बजावून मी फोन ठेवला.