प्राची गावस्कर
थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपल्याकडे पूर्वापार प्रचलित आहे. आर्थिक बाबतीतही ती अगदी सार्थ ठरते. सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी नानाविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे अक्षरशः एका क्लिकवर गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. गुंतवणुकीबाबत जागरूकताही वाढत आहे. आर्थिकदृष्ट्या आपले आयुष्य सुकर, चिंतामुक्त करण्यासाठी गुंतवणुकीशिवाय पर्याय नाही.
पूर्वीच्या काळात जमीनजुमला, स्थावर मालमत्ता, सोने-चांदी हे गुंतवणुकीचे लोकप्रिय पर्याय होते. काळानुरूप त्यात भर पडत गेली आणि गुंतवणुकीसाठी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, केंद्रसरकारच्या पोस्ट खात्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या अल्प बचत योजना, नोकरदार वर्गाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ईपीएफसारख्या योजना, विमा असे अनेक पर्याय उपलब्ध झाले. अलीकडच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर गुंतवणुकीसाठी अनेक पर्यायांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला या सेवा मिळणेही सोपे झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकही अतिशय सुलभ-सोपी झाली आहे.