

Moon Landing Conspiracy
esakal
अपोलोच्या तीन मोहिमांदरम्यान चंद्रावर मोठमोठे लेझर रेट्रोरिफ्लेक्टर्स ठेवलेले आहेत. शास्त्रज्ञ पृथ्वीवरून त्यावर लेझर किरणे पाठवून चंद्र-पृथ्वीचे अंतर अगदी मिलीमीटरमध्ये मोजू शकत आहेत. तेथून आणलेले खडक अनेक देशांच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिलेले आहेत. काही उपग्रहांना तेथील मोहिमांदरम्यानचा कचरा दिसलेला आहे. २०२१मध्ये भारताच्या चांद्रयानाने अपोलो यान उतरलेल्या जागांची छायाचित्रे घेतलेली आहेत. तेव्हा चंद्रावर माणूस गेला होता हे नक्की.
कटकाल्पनिकांच्या थरारक विश्वातील सर्वांत लोकप्रिय षड्यंत्र सिद्धांत आहे ‘इलुमिनाती’चा. ही गोपनीय संघटना. ती सर्व जगावर पडद्यामागे राहून राज्य करू पाहते. मग याच धर्तीवर येते ‘फ्री मेसन्स’. मग येतात ‘रॉथशिल्ड्स’. अगदी जॉर्ज सोरोस यांच्यापर्यंत ही मालिका येते. तमाम बॉन्डपटांतील खलनायक पाहा. तेही याच पठडीतले असतात. खलनायक कसले, स्वतंत्र संस्थानेच असत ती. म्हणजे थंडरबॉल, डायमंड्स आर फॉरएव्हर अशा चित्रपटांतून दिसलेला अर्न्स्ट ब्लोफेल्ड, मूनरेकरचा ह्युगो ड्रॅक्स हे समजा खलनायक नसते, तर नासासारख्या एखाद्या अंतराळ संस्थेचे मालक असते. त्यांच्याकडे पाहिले की वाटते, इलुमिनाती, रॉथशिल्ड्स अशा षड्यंत्र सिद्धांतांची चकचकीत व्यंगचित्रेच ती. कधीकधी तर बॉन्डपटांतून जाणीवपूर्वक या सिद्धांतांची टोपी उडवल्याचे दिसते. उदाहरणार्थ, डायमंड्स आर फॉरेव्हरमधील तो चांद्रगाडीच्या पाठलागाचा प्रसंग.