

Consumer Spending and Economic Growth
esakal
डॉ. अमेय खरे
आपण वीस हजार रुपयांची एखाद्या गोष्टीची खरेदी पुढे ढकलतो, हा आपल्या घरासाठी छोटा निर्णय आहे. पण लाखो कुटुंबांनी असेच निर्णय घेतले, तर त्याचा परिणाम बाजारातल्या मागणीवर, व्यवसायांच्या विक्रीवर, गुंतवणुकीवर आणि रोजगारावर होऊ शकतो. म्हणून पुढच्या ‘पैसे आहेत, पण आत्ता खर्च नको,’ असं म्हणताना हे लक्षात ठेवा, की हा केवळ आपल्या घराच्या बजेटचा निर्णय नसतो. तो अर्थव्यवस्थेतल्या मोठ्या प्रवाहाचा एक छोटासा भाग असतो.
महिन्याचा पगार खात्यात जमा झाला आहे; घरखर्च भागल्यानंतर काही रक्कम शिल्लक आहे; बऱ्याच दिवसांपासून नवीन मोबाईल घ्यायचा आ हे; घरासाठी एखादं उपकरण घ्यायचं आहे किंवा कुटुंबासोबत छोटीशी सहल करायची आहे; खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध आहे आणि गरजही आहे, तरीही आपण म्हणतो, ‘आत्ता नको, थोडं थांबू या...’ असं का होतं? कारण खर्चाचा निर्णय केवळ आज आपल्या हातात किती पैसा आहे यावर ठरत नाही. उद्या काय होईल, याबद्दल आपल्याला किती विश्वास आहे, यावरही तो ठरतो.
समजा, दोन व्यक्तींचं मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपये आहे आणि दोघांकडे जवळपास समान बचत आहे. पण पहिल्या व्यक्तीला आपली नोकरी सुरक्षित वाटते कारण उत्पन्न नियमित आहे आणि पुढच्या वर्षी पगार वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या व्यक्तीला मात्र नोकरीबद्दल अनिश्चितता आहे, त्यातच घरभाडं वाढू शकतं, कुटुंबात मोठा खर्च येऊ शकतो किंवा अचानक वैद्यकीय खर्चाची गरज भासू शकते. दोघांकडे पैसा सारखाच आहे. तरी पहिली व्यक्ती कदाचित नवीन फोन घेईल, बाहेर जेवायला जाईल किंवा सहलीचं नियोजन करेल. दुसरी व्यक्ती मात्र पैसा खात्यातच ठेवण्याचा निर्णय घेईल. म्हणजेच, पैसा असणं आणि तो खर्च करण्याची तयारी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.