

Potato Contract Farming India Success
esakal
बटाट्याशिवाय जेवण पूर्ण झाले, असे एकही घर दिसणार नाही. घरात इतर कोणत्याही भाज्या नसल्या, तरी बटाटा मात्र असतोच. पटकन शिजणारा, चविष्ट, इतर कोणत्याही भाजीबरोबर चटकन आपली जोडी जमवणारा बटाटा म्हणजे अगदी जादूई भाजीच! बटाटा केवळ आपल्या जिभेचे चोचले पुरवत नाही, तर बटाट्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर कमाईचे साधनही मिळवून दिले आहे. जमिनीत सोने पिकते, असे म्हणतात. अलीकडच्या काळात बटाट्याने शेतकऱ्यांना सोन्याचा भाव मिळवून दिला आहे. यातही विशेष म्हणजे अनेक बड्या कंपन्यांनी कंत्राटी शेतीचा पर्याय देऊन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमखास संधी उपलब्ध केली आहे. त्यामुळे बटाटा केवळ खाण्यासाठीच नव्हे, तर कमाईसाठीही मोलाचा ठरला आहे!
प्रवासात काहीतरी खायला हवे म्हणून वेफर्सचे पाकीट अनेकदा घेतले जाते. त्यातील वेफरचा एकसारखा आकार, चव बघून पूर्वी नेहमी प्रश्न पडायचा, असे एकदम गोल बटाटे यांना कसे मिळत असतील. आपण घरी वेफर्स केले, की सगळे वेगवेगळ्या आकाराचे होतात. एकदा पुण्याजवळ मंचरला गेले असता, येथे बटाट्याची कंत्राटी शेती केली जाते अशी माहिती मिळाली. तेव्हा वेफरच्या एकसारख्या आकारामागचे रहस्य उलगडले. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात बटाट्याची कंत्राटी शेती केली जात असून, लाखो शेतकऱ्यांना यामुळे निश्चित उत्पन्नाची हमी मिळाली आहे आणि शेतीतला नफा वाढविण्याचा मार्ग गवसला आहे.