हे तर आले....! चिमुकल्याला पडलेले प्रश्न....

saptahik sakal
saptahik sakal

-एकनाथ आव्हाड

सुशांत यावर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलाय. त्याच्यासमोर घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला समजून घ्यायची असते. उत्सुकता, उत्कंठा, कुतूहल त्याच्या अंगी ठासून भरलेलं! त्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्यासाठी तो घरी, आईबाबांना आणि शाळेत बाईंना सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतो.

पावसापाण्याचे दिवस. हवेत गारठा वाढलेला. संध्याकाळी बाबा कामावरून घरी आले ते पावसात भिजून आणि सर्दी, पडसं, खोकल्याने जाम होऊनच. घरात आल्याबरोबर त्यांना एकसारख्या शिंकाही यायला लागल्या. त्यांनी पटकन नाकावर रुमाल धरला. सुशांत तिथेच होता. त्याने बाबांच्या हातातली बॅग चटकन आपल्या हातात घेतली. आईसुद्धा स्वयंपाकघरातून बाहेर आली.

बाबा तिला म्हणाले, “सुलभा, मी कपडे बदलून, हातपाय धुऊन येतो; तोपर्यंत तू चांगलं आलं घालून गरमागरम चहा कर बरं. या सर्दी पडशाने अगदी हैराण झालोय मी. खोकून खोकून थकवाही खूप आलाय. आल्याच्या चहाने जरा तरतरी वाटेल. थकवा कमी होईल.”

“हो, आत्ता करून आणते आलं घालून चहा. आल्याचा रस, लिंबाचा रस आणि मध घेऊन त्यात पिंपळी घालते, ते रात्री प्या. बघा खोकला थांबेल तुमचा. सर्दी, खोकल्यावर हा रामबाण उपाय!” आई म्हणाली

बाबांनी मानेनेच होकार दिला आणि ते त्यांच्या खोलीकडे वळले. आई चहा करण्यासाठी स्वयंपाकखोलीकडे वळली. सुशांतसुद्धा आईपाठोपाठ स्वयंपाकखोलीत आला.

सुशांत यावर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलाय. त्याच्यासमोर घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला समजून घ्यायची असते. उत्सुकता, उत्कंठा, कुतूहल त्याच्या अंगी ठासून भरलेलं! त्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्यासाठी तो घरी, आईबाबांना आणि शाळेत बाईंना सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतो.

आताही सुशांतने स्वयंपाकखोलीत आल्याबरोबर आईला प्रश्न विचारलाच, “आई, सर्दी पडसं, खोकल्यावर गुणकारी असतं का गं आलं?”

“होय बाळा, आल्याच्या रसाचा खोकल्यात, श्वासविकारात माणसाला खूप फायदा होतो.”

सुशांतचा पुढचा प्रश्न तयार होताच.

“आई, मध्यंतरी मला खूप ताप आला होता बघ. तेव्हा माझ्या तोंडाला चवसुद्धा नव्हती. भूकही लागत नव्हती. त्यावेळी तू मला जेवायच्या आधी नेहमी आल्याच्या तुकड्याला मीठ लावून ते आलं खायला द्यायचीस. आठवतंय? आणि कधी ताप आल्यावर आलं आणि पुदिन्याचा काढा करून मला पाजायचीससुद्धा, ते का बरं?”

आई कामात हात चालवता चालवता हसून म्हणाली, “हं... चांगलंच लक्षात ठेवलंस की तू! अरे, जेवणापूर्वी आल्याचा तुकडा मीठ लावून खाल्ला की तोंडातल्या लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरते. तसंच जठरात रसस्राव अधिक वाढतो. मग सपाटून भूक लागते. तोंडाला चव येते. आणि महत्त्वाचं म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन चांगलं होतं. कारण आल्यात पाचकगुण भरपूर असतात. शिवाय आल्यामुळे कफ, वायूचा त्रास होत नाही. गळा, जीभही स्वच्छ राहते. आणि तापात जर आलं आणि पुदिन्याचा काढा करून प्यायलो तर घाम येऊन आपला ताप सरसर उतरतो. आहे की नाही हे आलं बहुगुणी?”

सुशांतने होकारार्थी मान हलवली. पण त्याचं अजूनही समाधान होईना. इकडे मात्र आईचा आलं ठेचून घातलेला फक्कड चहा तयार झाला. आल्याचा वास स्वयंपाकखोलीभर पसरला होता. कपात चहा गाळून ती तो वाफाळलेला चहाचा कप घेऊन बाहेर आली. सुशांतही बाहेर आला. बाबा खुर्चीत बसलेलेच होते... चहाची आतुरतेने वाट पाहत.

आईने बाबांच्या हातात चहाचा कप दिला. बाबांनी चहाचा एक घोट घेतला. लगेच ते म्हणाले. “वाह...! चहा पिऊन फार बरं वाटलं.”

सुशांतने आपला मोर्चा आता बाबांकडे वळवला. “बाबा, आई म्हणते, आलं हे बहुगुणी. त्याचे आणखी काही उपयोग तुम्हाला माहीत आहेत का हो? बाबांनी ‘सांगतो सांगतो...’ असं हाताने खुणावलं. आधी गरमागरम वाफाळलेला चहा त्यांनी पिऊन संपवला. कारण गप्पांमध्ये उगीच चहा गार व्हायला नको. चहा प्यायल्यावर त्यांना हुशारी आल्यासारखी वाटली. ते म्हणाले, “सुशांत, चहात आलं का घालतात माहितीय तुला? अरे, चहात आलं घातलं की या उष्ण पेयामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. सर्दी पडसं दूर होतं. डोकेदुखी थांबते. आल्यात अनेक औषधी गुण असतात बरं.

अरे, या आल्यापासून आलेपाक, मुरंबा, च्यवनप्राशही तयार करतात. पोटविकारांवर, कफावर, आमवातावर फार गुणकारी ठरतात हे पदार्थ. आणि आल्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून चटकदार लोणचंही करतात.”

सुशांतला बाबांकडून आल्याबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली. तरी त्याचे प्रश्न काही थांबत नव्हते. तो म्हणालाच,

“बाबा आल्याचं झाड केवढं मोठं असतं हो? आणि हो, हे आलं झाडावर चढून काढतात की काठीने खाली पाडतात...आंब्यांसारखं?”

saptahik sakal
‘कारकिर्दीबाबत समाधानी...!’, अंजन श्रीवास्तव

बाबा-आई दोघंही हसले. बाबा म्हणाले, “अरे, आलं काही झाडावर येत नाही. ते जमिनीखाली येतं हळदीच्या मुळीसारखं. आल्याचं झाड नसतंच मुळी. रोपं असतात. दीड दोन फूट उंचीची. त्याची पानं वेलचीसारखी असतात. अरे, आल्याचं रोप जसजसं वाढत जातं ना, तसतशी त्याची मुळं जमिनीत पसरत जातात. या मुळांच्या गाठीलाच आपण आलं म्हणतो. हे आलं शिजवून सुकवलं, की मग त्यापासून सुंठ तयार केली जाते. कळलं का आता?” (saptahik article)

“वाह ...! बाबा. भारीच आहे की हे आलं.”

आई हसून म्हणाली, “सुशांत, आज एवढा का रे त्या आल्याच्या मागे लागलास? बिचारे आलेराव घाबरले असतील तुला.”

बाबाही म्हणाले, “आणि सुशांत, अरे प्रत्येक पदार्थाचं महत्त्व असलं तरी त्याचा वापर नेहमी विचारपूर्वकच करावा. कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.”

“होय बाबा. अति तेथे मातीच. आणि आई, आज माझ्या प्रकल्पाला मला एक विषय मिळाला बरं.”

“अरे कसला प्रकल्प? कोणता विषय? कळेल असं बोलशील का काही?”

बाबाही म्हणाले, “हो ना. कसला रे प्रकल्प? नीट समजावून सांग बघू. मग आम्ही दोघंही तुला तुझ्या प्रकल्पासाठी आणखी माहिती देऊ. पण प्रकल्प पूर्ण करायचा मात्र तूच हं.”

“अहो बाबा, कालच आमच्या सातपुतेबाईंनी एक प्रकल्प सांगितला होता. त्या म्हणाल्या, कोणतीही एक वनस्पती घेऊन तिची माहिती लिहून काढा. म्हणजे त्या वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी जमीन, हवामान, पाणी, खतं, कीटकनाशकं आणि मुख्य म्हणजे त्या वनस्पतीचा मानवाला होणारा उपयोग ....अशी सर्व माहिती पुस्तकांतून, गुगलवरून शोधून काढायची. प्रकल्पवहीत क्रमवार लिहायची; त्या माहितीच्या अनुषंगाने त्या वनस्पतीची चित्रं गोळा करायची; ती त्या वहीत चिकटवायची.”

आई म्हणाली, “अरे, मग प्रकल्पासाठी तुला कोणती वनस्पती मिळाली?”

“...असं नाही मी सांगणार. कोड्यात सांगणार मी आणि तुम्ही ती ओळखायची.

चवीसाठी खाल्ले जाते, स्वयंपाकात वापरले जाते

सर्दी, खोकल्यावर तर, औषधासारखे काम करते

पाचक गुण याच्यात, भरभरून असतात

हळदीप्रमाणेच कुणाच्या मुळी, जमिनीखाली दिसतात?”

आई, बाबा पटकन म्हणाले, “अरे, हे तर आलं...!”

सुशांत म्हणाला,

“कोण आलं कोण गेलं, माहीत नाही मला

आल्याचे गुण मात्र, आता मी सांगेन वर्गाला.”

सुशांतचं बोलणं ऐकून आईने सुशांतला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. म्हणाली, “होय बाळा, आपल्या जवळचं ज्ञान इतरांनाही द्यावं. ज्ञान दिल्याने वाढतं.”

माय लेकराचं हे प्रेम बाबा जवळून पाहत होते. आज का कुणास ठाऊक, आल्याचा सुंगध घरभर पसरला आहे, असंच त्यांना 

वाटलं.

saptahik sakal
विज्ञानतीर्थे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com