

Share Market Analysis
esakal
बातम्यांच्या तालावर शेअर बाजार नाचत राहील व दोन्ही पक्ष थकल्यामुळे (जरी मान्य करत नसले तरी) आठ-पंधरा दिवसांत युद्धापलीकडे काहीतरी दुसरे बघायला लागेल. प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःची जोखीमक्षमता व वाट पाहण्याची तयारी बघून निर्णय घ्यायला हवा. मात्र भाव बऱ्यापैकी खाली आल्यासच (६५० ते ६७०) नव्याने शेअर विकत घेण्याचा विचार करावा.
भुंगा गुंऽऽऽ गुंऽऽऽ करत घरात येतो, आपण उगीचच घाबरून जातो. तो कधी कुठल्या दिशेने जाईल हे नक्की कळत नाही, ही त्याची खासियत! आणि तो अनप्रेडिक्टेबल राहतो हीच त्याची दहशत! पण त्याची भुणभुण आपल्याला असह्य होते. विज्ञानात त्याची हालचाल रॅंडम मोशन या सदरात मोडते. सध्या आपला शेअर बाजार असाच चालला आहे. कधी वर जाईल असे वाटावे, तर तो खाली येतो आणि खाली जाईल अशी खात्री पटली, की काहीतरी बातमी येते आणि तो वर जातो. असो.
खरेतर भुंगे मानवांसाठी, पाळीव प्राण्यांसाठी किंवा कपड्यांसाठी धोकादायक नसतात. त्यातल्या नर भुंग्यांना तर दंशही नसतो, त्यामुळे ते चावू शकत नाहीत. मात्र हा युद्धाचा भुंगा दंश न करताही आपल्याला त्रास देत आहे. हा त्रास कमी करण्यास आपले नेतृत्व समर्थ आहे, यावर विश्वास ठेवून त्याकडे लक्ष न देता आपले गुंतवणूक धोरण आखता आले, तर योग्य किमतीत खरेदी अथवा विक्री होईल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे.