योगेश ठाणगे
तंत्रज्ञानामुळे कार्स कशा प्रगत होत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सायबर सुरक्षा का महत्त्वाची ठरणार आहे, याचा वेध घेणारा हा लेख...
वाहन उद्योग सध्या ऐतिहासिक बदलांचा साक्षीदार ठरत आहे. धातू, गिअर आणि इंजिनवर आधारित असलेल्या कार्स आता सेन्सर, इलेक्ट्रॉनिक युनिट्स, इंटरनेट आणि सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या हुशार मशिनमध्ये रूपांतरित होत आहे. इलेक्ट्रिक वाहनं तर चाकांवर धावणारी संगणकच झाली आहेत. बॅटरी, मोटर, चार्जिंग व ब्रेकिंग यांसारख्या सर्व प्रणाली आता संगणकीय तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून आहेत. या डिजिटल परिवर्तनामुळे सोय, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरकता मिळते. पण त्याचबरोबर सायबर सुरक्षेचे गंभीर प्रश्नही उभे राहतात. कार्स जसजशा संगणकाधारित होत आहेत, तसतशाच त्यांच्यावर हॅकिंग, डेटाची चोरी, रॅन्समवेअर आणि प्रणाली बिघडवण्यासारखे धोकेही वाढत आहेत.