

Marine biology and oceanography
esakal
डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई
सागरतळावरील नऊ हजार मीटरपेक्षा खोल गर्तांमधील वातावरण पूर्णतः वेगळे आहे. तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तेथील संपूर्ण परिसंस्था केमो-सिंथेसिस प्रक्रियेद्वारे कार्यरत राहतात. या प्रक्रियेत सजीव मिथेनसारख्या रसायनांचा वापर उर्जा मिळवण्यासाठी करतात. अगदी १० हजार मीटर खोलीवरदेखील सजीव आढळून आले आहेत. यातून संपूर्ण अंधारात आणि प्रचंड दाबाखालीदेखील सजीव जिवंत राहतात आणि वाढतात हे लक्षात आले आहे.
आधुनिक विज्ञानामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या संशोधन क्षेत्रांमध्ये, सागरतळावरील संशोधन किंवा खोल समुद्रातील संशोधनाचा समावेश होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे ७० टक्के क्षेत्रफळ जरी सागराने व्यापले असले, तरी अजूनही त्याचा तळ बराचसा अज्ञात आहे. जवळपास ९९ टक्के विस्तार अजूनही शास्त्रज्ञांना अज्ञात आहे. अलीकडील काळात वेगाने विकसित होत गेलेले तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न, यांमुळे सागरतळावरील अद्भुत आणि आश्चर्यकारक माहिती उलगडत आहे. यामध्ये खोल पाण्यातील सागरी जीवन, भूशास्त्रीय प्रक्रिया आणि पृथ्वीच्या हवामानाशी संबंधित घडामोडी यांचा समावेश आहे.