

Effects of sleep deprivation on body
esakal
डॉ. सुबोध देशमुख
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात रात्री उशिरापर्यंत जागे राहणे हे एक फॅड झाले आहे. कामाचा ताण असो किंवा मोबाईलचा अतिवापर, लोकांच्या झोपण्याच्या वेळा पूर्णपणे बिघडल्या आहेत. निसर्गचक्राविरुद्ध वागल्याने आपल्या शरीराला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. शांत आणि पुरेशी झोप ही केवळ विश्रांती नसून ते आरोग्याचे एक महत्त्वाचे टॉनिक आहे. रात्री उशिरा झोपल्यामुळे शरीराच्या कार्यावर कसा परिणाम होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि थकवा जाणवतो. यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि लहान गोष्टींवरूनसुद्धा राग यायला लागतो. झोपेच्या अभावामुळे मनामध्ये सतत नकारात्मक विचार येण्याचे प्रमाण वाढते. दीर्घकाळ असेच राहिल्यास नैराश्य म्हणजेच डिप्रेशन किंवा अँक्झायटीचा धोका संभवतो. मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडल्यामुळे मानसिक शांतता पूर्णपणे हरवून जाते. कामात लक्ष न लागणे आणि निर्णय घेताना गोंधळ होणे असे प्रकार घडतात. मनाला ताजेतवाने करण्यासाठी रात्रीची शांत झोप अत्यंत आवश्यक असते.