

Deoria Tal Lake
esakal
पहाटेच्या चार वाजता अलार्म ठणठणला तेव्हा जगातली सगळी दुःख एकीकडं आणि हिमालयात ब्राह्म मुहूर्तावर उठणं एकीकडं हे वाटून गेलंच! पण केवळ तीन डिग्री तापमानात आराम बाजूला ठेवून, जी गोष्ट गेले कित्येक दिवस मॅनिफेस्ट करत आलोय, त्यासाठी हा त्याग काहीच नव्हता. पटकन सगळं आवरून पाच वाजता गावातल्या देवरियातालच्या कमानीतून आत शिरलो आणि पक्क्या बांधलेल्या फरसबंदी पायवाटेवरून पावलं वरच्या दिशेनं पडू लागली...
उत्तराखंडमधील एक अतिशय टुमदार आणि नितांत सुंदर गाव - सारी. दुपारी तीन-चारची वेळ. समोरच्या खोल दरीकडे तोंड केलेल्या आणि व्हॅली व्ह्यू असलेल्या एका अत्यंत सुंदर कॅफेच्या खिडकीतून वाफाळत्या कॉफीचे घोट घेत बाहेर बघत असतानाच मागून आवाज आला... ‘यार क्या नसीब है यार... जो देखने आये थे वो दिखा ही नहीं, इस क्लाउड्स के चक्कर में पूरा प्लॅन बरबाद हो गया!’ अपेक्षाभंगाच्या यातनेपुढे टिपीकल जेन-झी कुळातल्या तीन-चार शिव्या ऐकायला आल्यावर मात्र न राहवून मी मागे वळून पाहिलं. डेहराडूनच्या नवथर तरुणाईचा स्वर अगदी टिपेला पोहोचला होता. मावळलेला उत्साह आणि त्यातून धुमसणारी चिडचिड ह्यात अक्षरशः भरडून निघत होता तो ‘देवरियाताल’! ‘भैया आप भी मत जाओ कल । कुछ व्ह्यू नहीं दिखता है । इन्स्टावालों ने फोकट मी हाइप कर के रखा है,’ असा विचारला नसतानाही सल्ला देत माझ्या मूडची आणि उद्याच्या प्लॅनची वरात काढणाऱ्या त्या पोरांचा राग आला नसता तरच नवल! पण तितक्यात मागच्या उघड्या खिडकीतून पावसाचे अंगावर पडलेले तीन-चार थेंब, काळ्या ढगांनी सूर्याला गिळंकृत करून अचानकपणे अंधारून टाकलेला आसमंत आणि इतका वेळ स्वच्छ दिसणारं पण आता ढगांमध्ये लपलेलं चंद्रशिला शिखर या सगळ्यामुळे त्याचं सूतोवाच खरं वाटू लागलं. मनात काहूर माजलं, शंकेची पाल फुल व्हॉल्युम करून चुकचुकायला लागली. खरंच ज्याच्यासाठी इथपर्यंत आलोय ते दिसलंच नाही तर...?