Dharashiv Caves
Esakal
लयनकथा । अमोघ वैद्य
धाराशिवच्या प्राचीन लेण्यांमध्ये इतिहास, धर्म, कला आणि स्थापत्यशास्त्र यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. काळाच्या ओघात अनेक जटिलतेनंतरही याठिकाणानं आपलं वैभव आणि श्रद्धा टिकवून ठेवली आहे. या लेण्यांच्या प्रत्येक कोपऱ्यात कोरलेल्या शिल्पांमागे साधकांच्या अनन्य श्रद्धेची आणि कलागुणांची कहाणी दडलेली आहे. इतिहासाच्या सावलीतून उगमलेल्या या भिंती आजही भक्तांच्या नमनाच्या आणि तपस्वींच्या साधनेच्या साक्षीदार आहेत.
चंद्रकोरीच्या नाजूक प्रकाशानं जणू बालाघाटाच्या डोंगराला रेशमी स्पर्श केला, तिथंच धाराशिव शहरापासून सहा किलोमीटर पश्चिमेला, धाराशिवच्या लेणी जैन श्रद्धेचा प्राचीन दीपस्तंभ होऊन उभ्या आहेत. घळीच्या दोन्ही काठांवर कोरलेल्या सात लेणी, जणू कातळाच्या कॅनव्हासवर तपस्वींच्या स्वप्नांनी रंगवलेल्या... त्यातल्या चार उत्तरेकडे पश्चिमेच्या तेजाला नमणाऱ्या, तर तीन पहाटेच्या सौम्य सावलीत हरवणाऱ्या. हातला देवी मंदिरापासून खुरट्या पायवाटेनं, जिथं प्रत्येक पाऊल निसर्गाच्या हिरव्या गालिच्यावर उमटतं, किंवा बोंबल्या मारुती मंदिरापासून पक्क्या रस्त्यानं, जिथं डांबरी मार्ग डोंगराच्या सावलीत विलीन होतो; तिथून या पवित्र स्थळापर्यंत प्रवास होतो. लेण्यांच्या सान्निध्यात, कातळाच्या पोटातून उगमलेला शांततेचा साक्षीदार होऊन मराठा कालखंडातील शिव मंदिर डोंगराच्या पायथ्याशी नम्रपणे उभं आहे.