संजीव साबडे
केकची चव आधी आणि गंमत उशिरा कळली. म्हणजे मुलं थोडी मोठी झाल्यावर. घरी बर्थडे केक आणताना सोबत फुगे, मेणबत्त्या, लाकडी सुरी, मुखवटे असं बरंच काही येऊ लागलं. केकचं थोडं क्रीम उत्सवमूर्तीच्या तोंडात नव्हे, तर तोंडभर दिसू लागलं. केक वाया जायच्या भीतीने आपल्याच पोटात गोळा. आपल्यापैकी अनेकांना आपापल्या लहानपणी केकसाठीही संघर्ष करावा लागला होता!
केक हा प्रकार एकदम मस्त. अगदी छानशा साडीसारखाच. केक शॉप वा इराण्याच्या हॉटेलात गेलात तर साड्यांच्या दुकानात गेल्यासारखंच वाटतं. काय ते केकचे रंग, तो पोत, काय ती डिझाईन्स! केकच्या वरचं क्रीमचं डिझाईन म्हणजे पदरावरती जरतारीचा नाचरा मोरच! ते डिझाईन म्हणजे साडीचा पदर आणि मग मूळ साडी.
शिवाय ती नावं... व्हॅनिला, शिफॉन, ब्लॅक फॉरेस्ट, लेमन, जिनॉइज, रेड वेलव्हेट. तसेच असंख्य केक. चॉकलेट केक, लेमन केक, मार्बल केक, व्हॅनिला केक, शिफॉन केक, स्पॉन्ज, बटर, कोकोनट, बनाना, कॉफी, एंजल फूड, कप, चीज, कॅरट, पाऊंड, पाइनॲपल, प्लम, वाइन, रम, जिनॉइज, बंड, ख्रिसमस केक, हॅलोवीन केक, फ्लोअरलेस वगैरे.
भारतात साड्यांचे जितके प्रकार आहेत, तितक्याच वा जास्तही प्रकारचे केक असतील. क्रीम व अन्य टॉपिंगने केक सजवणं म्हणजे नव्या नवरीला मस्त पैठणी वा शरारा, साडी, हेअर स्टाइल, मेकअप, दागिने यांनी नटवण्यासारखंच असतं.