Diwali Chiwada
Esakal
सुप्रिया खासनीस
दिवाळीच्या फराळातील आवडीचा, कुरकुरीत व चटपटीत पदार्थ म्हणजे चिवडा. फराळात आपली कायमस्वरूपी जागा राखणारा हा पदार्थ एरवीसुद्धा तितक्याच आवडीने खाल्ला जातो, मग तो साधा असो, उपवासासाठी केलेला असो किंवा पथ्यकारक असो... अशाच काही खमंग आणि कुरकुरीत चिवड्यांच्या सोप्या पाककृती...
साहित्य
अर्धा किलो जाड पोहे, अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी काबुली चणे, १ वाटी शेंगदाणे, गरजेनुसार काजू-बेदाणे, १ चमचा खसखस, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, साखर, तिखट, तळण्यासाठी तेल.
कृती
आदल्या दिवशी सर्व कडधान्ये व शेंगदाणे वेगळे वेगळे भिजत घालावेत. सकाळी चाळणीतून पाणी काढून टाकून कपड्यावर पसरून कोरडे करून घ्यावेत. नंतर सर्व कडधान्ये व शेंगदाणे वेगळे वेगळे तळून घ्यावे. पोहे, काजू, बेदाणे तळून घ्यावेत. खसखस थोडीशी भाजावी. मोठ्या पातेल्यात हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. कढीपत्ता, पोहे घालून ढवळावे व खाली उतरवून ठेवावे.
सर्व तळलेले पदार्थ कागदावर पसरून जास्तीचे तेल काढून घ्यावे. त्यावर चवीनुसार मीठ, साखर, तिखट व खसखस थोडीशी बारीक करून घालावी व पोहे घालून एकसारखे करावेत.