Diwali Faral
Esakal
मृणाल तुळपुळे
फराळाचा कार्यक्रम म्हणजे माणसांना जवळ आणणारी, गोड-तिखट चवींची आणि आठवणींची मेजवानी असते. ह्या फराळाचे खरे सौंदर्य गोड व तिखट पदार्थांच्या संतुलनात आहे. फराळाची सुरुवात गोड पदार्थांनी केली जाते आणि तिखट पदार्थांनी त्याची लज्जत वाढवली जाते. फराळ म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची मेजवानी नसून प्रेम जपण्याची आणि संस्कृती पुढे नेण्याची परंपराच आहे.
दिवाळी हा दिव्यांचा व प्रकाशाचा सण. दिवाळीत घराघरांत आकाशकंदील व पणत्या लावल्या जातात, लक्ष्मीपूजन केले जाते, घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. या सणाचा अविभाज्य भाग म्हणजे दिवाळीतला फराळ.
प्रत्येक घरात दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच गोड आणि तिखट फराळाचे पदार्थ करण्याची तयारी सुरू होते. घराघरांतून त्या फराळाच्या पदार्थांचा खमंग वास यायला लागतो. गृहिणी आपले पाककौशल्य वापरून फराळाचे पदार्थ करताना दिसतात. त्या पदार्थांमागे आजी-आईच्या हाताची चव आणि पिढीजात पाककृती दडलेल्या असतात. प्रत्येक घरातील फराळाचे पदार्थ करण्याच्या पद्धतींत व चवींत थोडेफार बदल असले, तरी काही पारंपरिक पदार्थ मात्र सगळ्याच घरांत केले जातात.