Diwali Light
Esakal
घरातल्या अंगणात पहाटेच्या गार वाऱ्याची येणारी हलकी झुळूक... कुडकुडत्या थंडीतही अंगणात शिंपडलेल्या सड्याने चैतन्यमय झालेले वातावरण... अलगद उमललेल्या रातराणी, पारिजात, मोगऱ्याचा मनाला प्रसन्न करणारा गंध... भावस्पर्शी वाटणाऱ्या शोभिवंत रांगोळीने खुललेले घराचे सौंदर्य... त्याच क्षणी क्षितिजावर उगवणाऱ्या गगनराज भास्कराच्या कोटी कोटी किरणांनी उधळणाऱ्या अनलशरांनी झगमगणारे भुवन... असं वातावरण आपण जवळून अनुभवलंय. ते जगलंय. अशी प्रसन्न, चैतन्यमय आणि उत्साही सकाळ म्हणजेच दिवाळीची खरी चाहूल. दिवाळीचं आगमन फक्त दिनदर्शिकेतल्या तारखांपुरतं मर्यादित नसतं; दिवाळी असते मनःपटलावर विराजलेली!
दिवाळी म्हणजे केवळ घरातील सजावट, सुवासिक फुलांच्या आकर्षक माळा, अंधःकारावर मात करणाऱ्या दिव्यांचे तेज किंवा घराघरांसमोरील झगमगते आकाशकंदील एवढीच नसते. दिवाळी म्हणजे अंतःकरणात उमलणारी प्रेरणा, आनंद आणि आशेची उजळण. अंगणात रेखाटलेली नाजूक रांगोळी ही फक्त सजावट नसते, तर शुभक्षणांचे स्वागतचिन्ह असते. हवेत दरवळणारा फुलांचा सुगंध मन अनामिक प्रफुल्लित करतो. कुसुमाग्रजांनी शब्दबद्ध केलेल्या ओळी दिवाळीच्या या अनुभूतीला अधिक बोलक्या ठरतात...