अर्थगर्भ

साहजिकच एकाच वेळी त्या एका रेणूच्या दोन प्रती तयार होत त्याचं दुपटीकरण होणार होतं.
Arthgarbh
Arthgarbhsakal

...आता रेणूची प्रत तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. साहजिकच एकाच वेळी त्या एका रेणूच्या दोन प्रती तयार होत त्याचं दुपटीकरण होणार होतं. मग त्या दोन प्रती दोन कन्यापेशींना प्रदान करण्यात कोणती अडचण येणार होती! वारशाचं दान पुढच्या पिढीला देणं सहजसाध्य होणार होतं. हीच त्या संशोधनाची मख्खी होती. म्हणूनच ते संशोधन अर्थगर्भ मानलं गेलं यात नवल नाही.

भवभूतीच्या उत्तररामचरितासंबंधी एक आख्यायिका सांगण्यात येते. राम आणि सीता यांच्या प्रेमकूजनासंबंधी लिहिताना भवभूतीनं; ती दोघं एवढी गुंगून गेली होती की

अशा प्रकारे रात्र सरली, असं लिहिलं होतं, ‘रात्रीरेवं व्यरंसित’. कविकुलगुरू कालिदासाला जेव्हा ते दाखवण्यात आलं तेव्हा त्यानं त्यातल्या ‘व’वरच्या अनुस्वाराचं उच्चाटन केलं. ‘रात्रिरेव व्यरंसित’. म्हणजे रात्रच सरली, पण त्यांचं गुंजन संपलं नाही, असं त्या अनुस्वाराच्या वगळण्यानं ध्वनित केलं गेलं. म्हटलं तर अल्पसा बदल. पण त्यानं भावनाविष्काराला वेगळं परिमाण दिलं गेलं. मितभाषा किती कळीची भूमिका बजावू शकते याचं हे एक अप्रतिम उदाहरण म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

वैज्ञानिक लेखनात भाषेचा फाफटपसारा टाळण्यावरच भर दिला जातो. ‘इकॉनॉमी ऑफ वर्ड्स’ला प्राधान्य दिलं जातं. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्यावर भर असतो. म्हणून तर गणिती भाषेवर, समीकरणांवर भर असतो. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचं विवेचन ज्या शोधनिबंधात केलं गेलं होतं, त्या निबंधाच्या शेवटी दिलेल्या एका साध्या समीकरणानं सर्व काही सांगून टाकलं होतं.

Arthgarbh
Arthgarbhsakal

E = mC2 या एका समीकरणानं क्रांती घडवून आणली. केवळ आपल्या विचारांमध्ये मूलगामी बदल झाला, एवढंच नाही तर त्याचं रूपांतर तोवर अज्ञात असलेल्या ऊर्जेचं प्रकटीकरण करण्यात झालं. विजेची उपलब्धता वाढली तसंच हिरोशिमालाही त्यानं कवटाळलं. या मितभाषेचाच वापर क्रिक आणि वॉटसन यांनी आपल्या डीएनएच्या अंतरंगाचं, त्याच्या रचनाबंधाचं दर्शन घडवणाऱ्या शोधनिबंधात केला होता.

त्या निबंधातलं शेवटचं वाक्य अर्थगर्भ होतं. त्यांनी म्हटलं होतं, की ‘It has not escaped our notice that the specific pairing we have postulated immediately suggests a possible copying mechanism for the genetic material.’

इंग्रज एरवीही उगीच शब्दांची लांबण लावत नाही. अभिव्यक्त होताना तो थोडक्यात गोडी या न्यायानंच भाषेचा वापर करतो. त्याच्या या वृत्तीचं हे वाक्य प्रतीकच आहे. पण त्या एवढ्याशा आणि आत्मप्रौढीला बगल देणाऱ्या वाक्यानं जैवतंत्रज्ञानाचा पाया घातला असं म्हणणंच उचित होईल. डीएनए हे रसायन जर आनुवंशिक वारशाचं मूळ असेल, तर मग एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे त्याचं निष्ठापूर्वक दान करण्यापूर्वी त्याचं तंतोतंत दुपटीकरण होणं आवश्यक आहे.

Arthgarbh
Marathwada Muktisangram 2023 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेरलाने जपली देशसेवेची परंपरा

त्याची एक मुळाबरहुकूम प्रत तयार करता यायला हवी. ती करण्याची किल्लीच आम्ही प्रस्तावित करत असलेल्या त्या रसायनाच्या रेणूंच्या या रचनाबंधात आहे, हे किती कमी शब्दांमध्ये त्या दोघांनी सांगून टाकलं होतं!

कारण डीएनएच्या त्या गोल गोल जिन्यांच्या दोन कठड्यांना जोडणाऱ्या नायट्रोजनयुक्त घटकांच्या जोड्यांमध्येच ते तंत्र सामावलं गेलं होतं. त्या दोन पायऱ्या एकमेकींपासून दूर झाल्या, ते दोन कठडे विभक्त झाले की कोणत्याही एका पायरीवरच्या घटकासमोर त्याचा एकमेव जोडीदारच येऊ शकतो हे स्पष्ट झालं होतं.

तसं होत गेलं की एक कठडा आणि त्याच्यावर आरूढ झालेल्या घटकांपासून त्याचा सांगाती असलेल्या कठड्याची निर्मिती सहजशक्य असल्याचं त्या रचनाबंधानं सूचित केलं होतं. त्यातच त्या रचनाबंधाच्या प्रारूपाचं इंगित होतं. तो रचनाबंधच योग्य आहे याची ग्वाही त्या प्रणालीत दडलेली होती. तीच वॉटसन आणि क्रिक यांनी बोलून दाखवली होती. किमान शब्दांमध्ये. कोणत्याही अलंकारिक भाषेचं अवडंबर न माजवता.

जीवशास्त्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणणाऱ्या या संशोधनाचं श्रेय जरी वॉटसन आणि क्रिक यांना दिलं गेलं असलं, तरी त्यात त्यांना लंडनच्या मॉरिस विल्किन्स आणि त्याहूनही रोझालिन्ड फ्रॅन्कलिन यांची मोलाची मदत झाली होती. रोझालिन्डला इंग्लंडमध्ये त्या वेळीही असलेल्या स्त्रियांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीचा त्रास झाला होता. त्यामुळंही असेल कदाचित पण ती थोडीफार एकलकोंडी झाली होती.

त्याच बरोबर आपल्या कामाचं श्रेय कोणीतरी दुसराच लाटेल याचीही भीती तिला सतत वाटत असे. त्यामुळं आपल्या संशोधनाचे निष्कर्ष ती सहसा कोणाला दाखवत नसे. तिनं घेतलेली डीएनएची क्ष-किरण छायाचित्रं अतिशय बोलकी असल्याचं वॉटसनच्या कानावर आलं होतं. पण ती पहायला कशी मिळतील याची चिंता त्याला लागून राहिली होती.

तिच्याकडे थेट मागणं तर शक्यच नव्हतं. त्यावेळी क्रिकचे पीएच.डी.चे मार्गदर्शक मॅक्स पेरुत्झ यांची अनपेक्षित मदत मिळाली.

Arthgarbh
Pune Traffic : सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; एकेरी वाहतूक करण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष...
Arthgarbh
Arthgarbhsakal

मेडिकल रिसर्च काऊन्सिल या संस्थेनं रोझालिन्डच्या संशोधनाला आर्थिक मदत केली होती. अनुदान दिलं होतं. त्यामुळं तिच्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी काऊन्सिलनं पेरुत्झना गळ घातली. त्यांनी त्या कामाचं यथार्थ मूल्यमापन करून त्याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. त्यामुळं त्यांच्याकडे रोझालिन्डनं घेतलेल्या छायाचित्रांची सविस्तर माहिती होती. त्यातल्या त्यात ‘फोटो ५१’ या नावानं ओळखलं गेलेलं छायाचित्र तर अतिशय बोलकं होतं.

त्याची माहिती विनासायास वॉटसनला मिळाली. त्याचं अर्धं काम पार पडलं. पुढं जेव्हा या संशोधनासाठी वॉटसन, क्रिक आणि विल्किन्स यांना नोबेल पुरस्कार दिला गेला तेव्हा सर्वांनाच रोझालिन्डची आठवण झाली. तिला वगळण्यात आलं होतं. पण त्याचं कारण म्हणजे तोवर ती एका दुर्धर आजाराला बळी पडली होती. जगाचा तिनं निरोप घेतला होता.

मरणोत्तर नोबेल पुरस्कार देण्याची प्रथा नसल्यामुळं तिचा विचार झाला नाही, असा समज सर्वांनी करून घेतला. पण तिला वगळण्यात ती स्त्री असल्याच्या वास्तवाचा विचार झालाच नाही, असं कोणीही छातीठोकपणे म्हणू शकत नाही. ‘डार्क लेडी’ असंच तिचं वर्णन आजवर केलं गेलं आहे.

Arthgarbh
Solapur News : साठवणूक क्षमता वाढविल्यास सुरळीत पाणीपुरवठा जादा क्षमतेच्या २५ जलकुंभांचा प्रस्ताव एमजीपी’कडे

वॉटसन आणि क्रिक यांना नोबेल पुरस्कार मिळणं निश्चितच उचित होतं. तरीही रोझालिन्डच्या मित्रमंडळींनी आणि अर्विन चारगॅफनंही त्यावर आक्षेप नोंदवले होते. चारगॅफचं म्हणणं होतं की अडेनिन आणि थायमिन तसंच ग्वानिन आणि सायटॉसिन यांच्या जोड्यांनी कळीची भूमिका पार पाडली होती. आणि तशा जोड्या असतात हे आपणच प्रथम दाखवून दिलं होतं.

खरंय. पण त्याचं प्रयोजन काय हे तो सांगू शकला नव्हता. त्या बाबतीत जगावेगळा विचार करत वॉटसन आणि क्रिक यांनी तारेच्या आणि चकत्यांच्या माध्यमातून रचनाबंध तयार करण्याचा अनोखा मार्ग अनुसरला होता. त्यात त्या जोड्यांमध्ये लपलेलं इंगित ओळखलं होतं. त्याचाच विचार नोबेल समितीनं केला हे योग्यच होतं.

त्यात त्यांच्या त्या एका वाक्यानं तर त्यांच्या संशोधनाचं मूल्य कितीतरी पटीनं वाढवलं होतं. कारण आता त्या रेणूची प्रत तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दोन कठडे एकमेकांपासून वेगळे झाले की त्यातल्या एकावर लगडलेल्या अडेनिनच्या साथीला दुसरा कठडा तयार होऊन त्यावर थायमिनची वर्णी लागू शकते हे स्पष्ट होतं.

त्यामुळं एका कठड्यावरच्या पायरीचा जोडीदार आपोआप उपस्थित होत त्या रेणूची तंतोतंत प्रत तयार होणं शक्य होतं. साहजिकच एकाच वेळी त्या एका रेणूच्या दोन प्रती तयार होत त्याचं दुपटीकरण होणार होतं. मग त्या दोन प्रती दोन कन्यापेशींना प्रदान करण्यात कोणती अडचण येणार होती! वारशाचं दान पुढच्या पिढीला देणं सहजसाध्य होणार होतं. हीच त्या संशोधनाची मख्खी होती. म्हणूनच ते संशोधन अर्थगर्भ मानलं गेलं यात नवल नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com