निनाद केळकर
विनाकारण इतरांवर भुंकणे, इतरांना चावणे किंवा आक्रमक वर्तन, आत्मविश्वासाचा आभाव, विनाकारण घाबरणे अशा अनेक समस्यांचे निराकरण आपण प्रशिक्षणाद्वारे यशस्वीपणे करू शकतो. योग्य प्रशिक्षण मिळाल्याने श्वान आत्मविश्वासाने वावरतो.
पाळीव प्राण्यांसंदर्भात फेसबुक/ इन्स्टाग्रामवर आजकाल नेहमी दिसणारी पोस्ट जर कुठली असेल, तर ती म्हणजे कला आणि कलाकार (The Art and The Artist). दोन फोटो असतात त्यात. एखादा छिन्नविच्छिन्न झालेला सोफा अथवा उशी, नाहीतर मरणासन्न अवस्थेतली चप्पल किंवा बूट. तर ही कलाकृती (Art) आणि त्याच्या शेजारी पहुडलेला बेफिकीर आणि नटखट, नाठाळ कलाकार कुत्रा किंवा मांजर.
ह्याच धर्तीवरील दुसरे उदाहरण म्हणजे, चॅनल न बदलता येणारा कुरतडलेला टीव्ही रिमोट. अजून एक पोस्ट असते ती म्हणजे, Dog Adoption Appeal. ह्या पोस्ट्समधला गमतीचा भाग जरा बाजूला ठेवला, तर मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्या श्वानांच्या पालकांची असहायता, योग्य माहितीचा अभाव किंवा त्याबाबतची उदासीनता.
तुमच्या पाळीव प्राण्याचे बेशिस्त वर्तन हा कौतुकाचा विषय अजिबात नाही हे खरेतर पालकांच्या लक्षातच येत नाही. वरवर पाहता ही समस्या खूप छोटी वाटते किंवा हा विषय खूप गमतीचा वाटतो, पण पुढे जाऊन तो मोठ्या समस्येचे रूप घेऊ शकतो.