

Third World Countries
esakal
अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्या जगातील नागरिकांना युनायटेड स्टेट्सच्या राज्यांमध्ये स्थलांतरित होण्यापासून रोखणार, असे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर काहीशी अडगळीत पडलेली तिसऱ्या जगाची संकल्पना पुन्हा चर्चेत आली. तसेच भारत या तिसऱ्या जगातील देश आहे का? अशी शंकाही काहींना सतावू लागली. त्या पार्श्वभूमीवर मागे पडत चाललेली तिसरे जग ही संकल्पना, नव्याने विकसित होत असलेली दक्षिण जगाची संकल्पना आणि भारताची भूमिका या सर्वांचा घेतलेला परामर्श.
डोनाल्ड ट्रम्प यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो गणराज्य, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन, बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लिऑन, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला या देशांतील नागरिकांच्या स्थलांतरावर बंदी घाण्यात आली आहे, असा दाव तेथील माध्यमांनी केला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हे सर्व देश तिसऱ्या जगातील आहेत. या निर्णयामुळे संबंधित देशांतील नागरिकांना अमेरिकेत स्थलांतर करण्यास किंवा तेथील नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्यास मनाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.
अमेरिकेतील व्हाइट हाऊसजवळ २६ नोव्हेंबर २०२५ रोजी एका हल्लेखोराने नॅशनल गार्डच्या गस्ती पथकावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात दोन गार्ड गंभीर जखमी झाले. त्यापैकी सारा बेक्स्ट्रॉम या महिला अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरे अधिकारी अँड्रयू वोल्फ गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला करणारा रहमानुल्ला लाकनवाल हा अफगाण नागरिक असल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. अमेरिकेत सत्तेत आल्यापासूनच स्थलांतरितांबाबत कठोर धोरण अवलंबणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. मात्र एवढ्यावरच न थांबता ‘तिसऱ्या जगा’तील देशांमधून अमेरिकेत स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना रोखण्याची घोषणाही त्यांनी ट्रुथ या समाज माध्यमातून केली. ट्रम्प यांच्या या घोषणेच्या निमित्ताने शीतयुद्धाच्या काळात उदयास आलेली तिसऱ्या जगाची संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.