

Domestic violence in marriage
esakal
राज्यात सध्या वेगवेगळ्या माध्यमांतून डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येबाबतच्या बातम्या येत आहेत. मुळात त्यांची आत्महत्या की हत्या यावरूनही प्रवाद आहेत. मूळ मुद्दा आहे तो तिचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आवाहनाचा. त्यांनी असे म्हटले आहे की यापुढे पालकांनी ‘आपली मुलगी श्रीमंत घरात देऊ नये.’ आजपर्यंत आपल्या मराठी घरांमध्ये एक अलिखित संकेत होता तो म्हणजे ‘सून आणायची गरीब घरातून पण मुलगी द्यायची ती खात्यापित्या घरात, थोडक्यात सुखवस्तू घरात.’ प्रत्येकवेळी कुणी आवर्जून श्रीमंत घर पाहत असतात असे नाही, मात्र आपल्या मुलीला चांगले घर मिळावे व तिला संसारातल्या खस्ता कमी खायला लागाव्यात असे कुणाही बापाला वाटणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र पालवे कुटुंबाच्या, म्हणजे गौरीच्या बाबतीत जे काही घडले ते तपासात पुढे येईलच, पण आज तरी मिळालेल्या माहितीनुसार तिला नको त्या गोष्टींचा सामना करावा लागला आणि ज्याच्या भरवशावर ती आपले घर सोडून सासरी आली होती, त्याच्यावरचाच भरवसा संपला हे प्रथमदर्शनी दिसत आहे.