mohan bhagavat
Esakal
डॉ. मोहन भागवत
गेल्या हजार वर्षांत आपल्यात चुकीच्या गोष्टी शिरल्या आणि आपण त्यांनाच परंपरा मानू लागलो. इंग्रजांनी आपले ‘ब्रेनवॉशिंग’ केले आणि आपल्या पूर्वजांबद्दल, संस्कृतीबद्दल तिरस्कार उत्पन्न केला. हा प्रयत्न आजही आहे, कारण भारत विश्वगुरू झाला, तर त्यांची ठेकेदारी संपेल. म्हणून या सगळ्या जंजाळातून मार्ग काढून ‘आम्ही कोण?’ हे स्पष्ट समजून घेतले पाहिजे.
‘वि श्वगुरू भारत’ व्हावा अशी आपल्या सर्वांची स्वाभाविक आकांक्षा आहे. कारण आपण सगळे भारतीय आहोत. पण, वर्तमान जगाची स्थिती पाहता असा प्रश्न पडतो, की खऱ्या अर्थाने विश्वाला गुरूची आवश्यकता आहे का? आजचे जग पूर्वीपेक्षा भौतिकदृष्ट्या अधिक सुखी आणि सुविधांनी युक्त आहे. असाध्य वाटणारे रोगही तंत्रज्ञानाने बरे करणे शक्य केले आहे, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था वेगवान झाली.
एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध आहे. पण, भौतिक सुख असूनही, जग अस्थिर आणि अशांत आहे. सोयीसुविधा वाढल्या, पण माणसांमधील संवाद आणि मनःशांती कमी झाली. कुटुंबं तुटत आहेत, घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत. वैयक्तिक जीवनातील ही स्थिती जागतिक पातळीवरही दिसून येते. युद्धे सुरूच आहेत, आपसांतील द्वेष आणि कट्टरता कमी झालेली नाही. ज्या पर्यावरणाच्या आधारावर आपण जगतो, त्याचा ऱ्हास होत आहे. अन्न, पाणी, हवा विषारी झाली आहे. नैसर्गिक ऋतुमान बिघडले आहे.