

Exploring Dubai’s Culture and Markets
esakal
ऋचा कुलकर्णी-पानसे
दुबईची खाद्यसंस्कृतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध प्रकारचे अरबी पदार्थ येथे चाखायला मिळाले. दुबईचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील प्रसिद्ध बाजारपेठा. दुबईच्या पारंपरिक बाजारांमध्ये फिरताना अरबी संस्कृतीचा वेगळाच अनुभव मिळाला. सुगंधाने भरलेल्या अत्तरांच्या दुकानांनी लक्ष वेधले. विविध प्रकारची सुगंधी अत्तरे पाहून आश्चर्य वाटले.
ज ग पाहावे, अनुभवावे आणि प्रवासातून काहीतरी नवीन शिकावे, असे म्हटले जाते. प्रवासामुळे नवीन जीवनशैली, संस्कृती, इतिहास आणि तंत्रज्ञान यांचा जवळून परिचय होतो. म्हणूनच मी माझ्या आई-बाबांसोबत दुबईची एक अविस्मरणीय सफर केली. संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) दुबई हे शहर जगातील सर्वात आधुनिक, प्रगत आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे झगमगते शहर वाळवंटात वसलेले आहे. भव्य इमारती, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उंची जीवनशैली आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम या देशात अनुभवायला मिळतो.
मुंबईहून विमानप्रवास करून आम्ही अबू धाबी इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचलो. विमानतळावर उतरल्याक्षणी तेथील स्वच्छता, शिस्त व आधुनिक सुविधा पाहून प्रवासाचा शीण निघून गेला. शहरातील शिस्तबद्ध वाहतूक, उंच व भव्य इमारती पाहून मन भारावून गेले. सर्वप्रथम आम्ही अबू धाबी येथील फेरारी वर्ल्ड पाहिले. लाल रंगाच्या वास्तूमुळे हे ठिकाण दुरूनच लक्ष वेधून घेते. येथे विविध प्रकारच्या कार्स बघायला मिळाल्या. जगातील सर्वात वेगवान रोलर कोस्टर फॉर्म्युला रेसचा थरार अनुभवला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साहसी राइड्स यांचा मनमुराद आनंद घेता आल्यामुळे फेरारी वर्ल्डची भेट संस्मरणीय ठरली.