प्रफुल्ल बरगटकर
महाराष्ट्राच्या पूर्व भागात वसलेला विदर्भ केवळ संत्र्यांसाठीच नव्हे, तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. याचा अनुभव मी माझ्या भटकंतीत सातत्याने घेतो. पूर्व विदर्भ हा भाग सातपुड्याच्या उतरत्या डोंगररांगेत असल्याने विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. खरेतर हा भाग म्हणजे आमच्या भटक्यांसाठी जणू छोटं कोकणच आहे.
सह्याद्रीकडून येणारे ढग जेव्हा भारताच्या उत्तरेकडे मार्गस्थ होतात, तेव्हा सातपुडा डोंगररांगेच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या परिसरात भाताची शेती मोठ्या प्रमाणात होत असल्याने खाद्यपदार्थांत तांदळाचा समावेश असतोच असतो.
भाताच्या शेतीने संपूर्ण परिसर व्यापत असल्याने संपूर्ण परिसरात हिरवी चादर पसरल्याचा भास होतो. रस्त्याचा कडेला छोट्या मोठ्या तलावामध्ये कमळे फुललेली दिसतात. त्यातून वेगळ्याच आनंदाची अनुभूती मिळते. झाडीपट्टी बोलीभाषा, वेशभूषा आणि खाद्यसंस्कृतीचे वेगळेपण आपण अनुभवू शकतो.