विलायती वाचताना : डॉ. आशुतोष जावडेकर
आपण जे वाचतो त्या इंग्रजी पुस्तकाचा गोषवारा आपण इंग्रजीमध्येच लिहून ठेवला, तर एक मोठा गृहपाठ होतो. पुढे आपल्याला संदर्भ म्हणूनदेखील तो अतिशय उपयोगी पडतो. याला जी शिस्त लागते ती कमवायला हवी. मुळात या सगळ्यासाठी मेहनत घ्यायला हवी. आणि पुढे एक मोठा दुर्लभ आनंद आपली वाट बघतो आहे ही जाणीव ठेवून ती मेहनत घेतली, तर त्या मेहनतीचाही फार मोठा आनंद मिळतो.
बरोबर वर्षांपूर्वी माझं आणि साप्ताहिक सकाळच्या संपादकांचं बोलणं झालं आणि मराठी वाचकांना इंग्रजी वाचनाची गोडी लावण्यासाठी मी सदर लिहावं असं ठरलं. गेले वर्षभर अनेक कोनांमधून मी इंग्रजी वाचन या विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेत गेलो. सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे मी सदरात सुचवलं असेल, त्यापलीकडे जाऊन तुम्ही भरपूर वाचायला लागलात.
कधी प्रतिक्रिया वेळेत आल्या, कधी खूप उशिरा आल्या. कधी फोन आले, कधी माझ्या समाज माध्यमांवर मेसेज आले. नेमका आणि अभ्यास करणारा वाचक या सदराला मिळाला आणि म्हणून हा वर्षभराचा प्रवास सुखद झाला. आज शेवटचा लेख लिहिण्याआधी तुम्हा सर्व वाचक मित्रांचे मनापासून आभार.