

Eco-Anxiety in India
esakal
मुक्ता चैतन्य
‘अंडरस्टँडिंग इको-अँक्झायटी ॲण्ड लिव्ह्ड एक्स्पिरियन्सेस ऑफ यंग अडल्ट्स इन इंडिया अबाऊट क्लायमेट चेंज’ या संशोधनात भारतातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनातून असं स्पष्ट झालं, की भारतातल्या तरुणांच्या मते, हवामान बदल ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून, ती मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करणारी बाब ठरत आहे.
जाणून घेऊ या इको-अँक्झायटीविषयी...
लीकडेच ‘इको-अँक्झायटी’ ही संकल्पना वाचनात आली. इको-अँक्झायटी (Eco-Anxiety) म्हणजेच बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या साखळीतील बिघाडांमुळे भविष्याबद्दल निर्माण होणारी तीव्र भीती, ताण आणि असहायतेची भावना. संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ) आणि विविध थिंक-टँक्सच्या अभ्यासानुसार, जेन-झी (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी) या संकटाच्या केंद्रस्थानी आहे. आपण श्वसनाद्वारे शरीरात घेत असलेली हवा, आपण पीत असलेले पाणी, आपले अन्न इथपासून ते वितळणाऱ्या हिमनद्या, बेसुमार जंगलतोड, नद्यांचे व समुद्राचे प्रदूषण, ऋतुचक्र विस्कळीत होणे, याविषयी सत्तेतल्या लोकांना काळजी नसल्याचे वाटणे, पुढच्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी राहण्यायोग्य ठेवण्यापेक्षा स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सत्ता आसुसलेली असल्याचे वाटणे - या सगळ्या गोष्टींचा तरुणाईच्या मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होतो आहे, असे हा अहवाल सांगतो.
इको-अँक्झायटीविषयी वाचत असताना एका कार्यशाळेत एका दहा-बारा वर्षांच्या मुलीने विचारलेला प्रश्न आठवला, ‘संपूर्ण पृथ्वीवर जर कचरा झाला तर काय होईल?’ त्या चिमुकल्या वयात तिला फक्त तो प्रश्न पडलेला नव्हता, तर तिला काळजी वाटत होती; पृथ्वीची, तिच्यासारख्या असंख्य मुलांची आणि त्यांच्या भवितव्याची.
जेन-झी आणि जेन-अल्फा पिढ्यांना त्यांच्या आजूबाजूला सतत दिसणारा पर्यावरणीय ऱ्हास अस्वस्थ करतो आहे. आपण ज्या जगात मोठे होत आहोत, ते मागच्या पिढ्यांनी किमान जगण्याच्या पात्रतेचेही ठेवलेले नाही याची जाणीव त्यांना स्वतःच्या भविष्याविषयी प्रचंड अस्वस्थ करत आहे, असं हा अभ्यास सांगतो. अनेक तरुण-तरुणी अशा प्रदूषणानं आणि निसर्गाच्या बेसुमार ऱ्हासानं वेढलेल्या जगात मुलं जन्माला घालायची का, असा प्रश्न विचारू लागली आहेत. जन्माला आलेल्या बाळाला जर शुद्ध हवा मिळणार नसेल, आईच्या दुधातूनही PFASसारखी विषारी रसायने बाळापर्यंत पोहोचणार असतील, तर मुलं जन्माला घालून त्यांना या प्रदूषित जगात जगायला कशाला भाग पाडा, असा विचार तरुणाई करते आहे. इतकेच नाही, तर करिअर आणि आयुष्याचे विविध टप्पे यांचं नियोजन करण्याबाबतही ही तरुणाई निरुत्साही आहे. यालाच संशोधकांनी इको-अँक्झायटी नाव दिलंय.